आचारसंहितेच्या धास्तीने परभणी शहरात सर्वत्र तारांबळ उडाली. file Photo
परभणी

परभणी : आचारसंहितेच्या धास्तीने उडाली तारांबळ!

पुढारी वृत्तसेवा

परभणी : आज लागणार की उद्या, या चर्चेत असलेली विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता मंगळवारी (दि.१५) दुपारी ४ वाजल्यापासून लागणार असल्याच्या वृत्ताने आचारसंहितेची धास्ती घेत विविध राजकीय पक्षांची मोठी तारांबळ उडाली. शहरभर लागलेले हजारो होडिंग काढण्यासाठी जणू स्पर्धाच लागली होती.

याच धावपळीत गेल्या अनेक वर्षांपासून काम सुरू असलेल्या बसपोर्टच्याही उद्घाटनाचा सोपस्कार पार पाडला गेला. विधानसभा निवडणुकीसाठी दसऱ्यानंतर आचारसंहिता लागणार हे जवळपास निश्चित होते. सोमवारीच याबाबतची घोषणा होईल, असे अपेक्षित असल्यामुळे तत्पूर्वी आलेल्या शनिवार, रविवारच्या सुट्टीमुळे मागील आठवड्यात विविध शासकीय विभागांतील कामांची वर्क ऑर्डर करून घेण्यावर सर्वांचाच भर होता. त्या दृष्टीने मागील आठवडाभर ही कार्यालये गजबजून गेली होती.

प्रामुख्याने जिल्हा नियोजन समितीकडून गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या कोट्यावधी रूपयांच्या निधीची कामे मंजूर असलेल्या कामांच्या वर्कऑर्डर करून घेण्यासाठी सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांसह विरोधी पक्षातील पदाधिकारीही सरसावले होते. कामांची संख्या मोठी असल्याने कसरत करून याबाबतचे आदेश आचारसंहितेपूर्वी पारीत करून घेण्यासाठी मोठी धावपळ झाली. तरी देखील काही कामांच्या ऑर्डर होऊच शकल्या नाहीत.

मंगळवारी सकाळी निवडणुक आयोगाने राज्यातील निवडणुकीसाठी दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषदेतून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असे स्पष्ट केल्यानंतर तर सर्वांनीच आपापली कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मागील काही दिवसांत असलेले सण, उत्सव है या विधानसभा निवडणुकीसाठी प्रसिद्धीचे माध्यम ठरले. त्याचमुळे गणेशोत्सव व पाठोपाठ आलेल्या नवरात्रौत्सवात सर्वच मंडळांसह राजकीय पक्षांनी शहरभर शेकडो होडींग लावुन ठेवलेले होते. दसऱ्यानंतर दोनच दिवस उलटले असल्याने हे होर्डिंग अद्याप काढले गेलेले नव्हते.

त्याचबरोबर आ.डॉ. राहुल पाटील यांच्या सोमवारच्या वाढदिवस निमीत्ताने तर संपूर्ण शहर होडींगमय झाले होते. शेकडो होडींग मध्यवर्ती भागासह राष्ट्रीय महामार्गावरही लावले गेले होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर या होडींगने झाकोळून गेला होता. मात्र दुपारी आचारसंहिता लागण्याच्या धास्तीने सर्वांनीच सकाळपासून या होर्डींग हटविण्यावर भर दिला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT