Farmers' opposition to Shaktipeeth highway continues
परभणी, पुढारी वृत्तसेवा :
जिल्ह्यातील तीन तालुक्यांतून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. शनिवारी (दि.२८) तालुक्यातील पोखर्णी नृसिंह येथे शेतकऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत जीव गेला तरी बेहत्तर पण महामार्गासाठी जमिनी देणार नाहीत, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे शक्तिपीठासाठी दि.१ जुलैपासून होऊ घातलेल्या जमीन अधिग्रहणाच्या वेळी संघर्ष होण्याचे दाट संकेत मिळत आहेत.
शक्तिपीठ हा महामार्ग परभणी जिल्हयातील परभणी, सोनपेठ, पूर्णा या तीन तालुक्यांतून जाणार असून जवळपास दीड हजार एकर जमीन महामार्गासाठी अधिग्रहीत करण्यात येणार आहे. यासाठी मावेजा म्हणून २० हजार कोटींची तरतूद शासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे. यात ज्या शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे.
त्यामुळे ते भूमिहीन होणार आहेत. सदरील जमीन ही जमीन नसून आमच्या काळजाचा तुकडा आहे. जीव गेला तरी बेहत्तर परंतू आमची जमिन देणार नाही अशी ठाम भूमिका पोखर्णी येथे झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी घेतली. शक्तीपीठ महामार्ग परभणी तालुक्यातील सर्वाधिक १५, सोनपेठ तालुक्यातील १० तर पूर्णा तालुक्यातील ५ गावांतून जाणार आहे. या मार्गासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेत शिवांकन करण्याचा प्रयत्न सुरू असून लवकरच जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. जमीन अधिग्रहण प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. ते शेतकरी एकवटले असून शक्तिपीठ महामार्गाला तिव्र विरोध करीत आहेत. संविधानिक मागनि आंदोलन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.
तालुक्यातील पोखर्णी येथे झालेल्या बैठकीस गोविंद घाटोळ, अॅड. माधुरी क्षीरसागर, शांतीभूषण कच्छवे, उर्मिला पवार, सोनाली देशमुख, विजय बेले, सतीश घाडगे, अमृतराव शिंदे, विजय झरकर, दत्ता वाघ, अनिल नाईक, विठ्ठलराव गरूड व शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती.
जिल्हा प्रशासनाने शक्तिपीठ महामार्गाबाबत शेतकऱ्यांच्या हरकती मागविण्यात आल्या होत्या. प्रशासनाने हरकती मागविल्या असल्या तरी सुनावणी मात्र घेतली नसून जमीन अधिग्रहणाची प्रक्रियाही सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांची मुस्कटदाबीच करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे..
परभणी तालुक्यातील उखळद, बाभळी, पिंगळी, शेंद्रा, टाकळगव्हाण, लोहगाव, सहजपूर जवळा, अमडापूर, ताडपांगरी, आंबेटाकळी, पोखर्णी, दैठणा, इंदेवाडी, साळापुरी, सोनपेठ तालुक्यातील शिर्शी, डोंबी तांडा, शिर्शी बु., कान्हेगाव, सायखेडा, शेळगाव, नरवाडी, कोनाठा, डिघोळ, इस्माईलपूर, पूर्णा तालुक्यातील सुरवाडी, आहेरवाडी, नावकी, कात्नेश्वर, पिंपळगाव, पिंपळगाव बाळापूर या गावांतून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे.