मानवत : जालना जिल्हयातील परतूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आ.बबनराव लोणीकर यांनी एका जाहीर सभेत शेतकरी व महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले. यामुळे त्यांचे विधानसभा सदस्यपद तात्काळ रद्द करावे अन्यथा याप्रश्ननी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मानवत तालुका शेतकरी सुकाणू समितीने शुक्रवारी (दि.27) तहसीलदार पांडूरंग माचेवाड यांच्यामार्फत राज्यपालांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात आ.लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केला असून वास्तविक पाहता बबनराव लोणीकर व त्यांचे आजोबा यांच्या जन्माच्या आधीपासून शेतकर्यांच्या मायलेकी अंगावर कपडे घालतात व शेतकरी शेतात पेरणी करत असून शासकीय योजनेचे पैसे द्या, अशी मागणी कधी केली नाही. तर मताच्या जोगव्यासाठी या योजना सरकारने सुरू केल्या असल्याचा टोला निवेदनात लगावला आहे.
निवेदनावर शेतकरी सुकाणू समितीचे संतोष आंबेगावकर, गोविंद घाडगे, दत्तराव शिंदे, लिंबाजी कचरे, अशोक बारहाते, संपत पंडित, बंडूनाना मारकळ, पांडुरंग वझुरकर, बालासाहेब आळणे, विष्णू जाधव, आसाराम दुधे, संजय देशमुख यांच्या स्वाक्षर्या आहेत.