पूर्णा ः चुडावा रेल्वेस्टेशन परिसरातील सिमेंट उद्योगाविरोधात गावोगावी जनजागृती करताना शेतकरी.  pudhari photo
परभणी

Parbhani farmers protest : चुडावा येथील सिमेंट स्लीपर उद्योगाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

परवानगीविना प्रकल्प, शेती नापिकीची भीती; गावोगावी आंदोलनासाठी होतेय जनजागृती

पुढारी वृत्तसेवा

पूर्णा ः तालुक्यातील चुडावा रेल्वे स्टेशन परिसरातील गट क्रमांक 265/1, 271 व आसपासच्या शेती पट्ट्यात प्रस्तावित सिमेंट स्लीपर उद्योगावरून प्रचंड संतापाची लाट उसळली. कोणतीही पर्यावरणीय परवानगी, प्रदूषण नियंत्रण मंडळाची मंजुरी किंवा पारदर्शक प्रशासकीय प्रक्रिया न राबवता हा प्रकल्प दडपशाही पध्दतीने उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून होत असून आगामी आंदोलनासाठी गावोगावी जावून अन्य शेतकऱ्यांत जनजागृती केली जात आहे.

स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एका मोठ्या रेल्वे कंत्राटदाराकडून दलालांच्या माध्यमातून सुमारे 15 एकर सुपीक शेतजमीन खरेदी करून या ठिकाणी सिमेंट स्लीपर निर्मिती उद्योग उभारण्याचा घाट घातला जात आहे. मात्र या प्रकल्पामुळे निर्माण होणारी सिमेंटची प्रचंड धूळ, सततचा औद्योगिक आवाज, जमिनीतील कंप आणि प्रदूषण यामुळे परिसरातील शेती पूर्णपणे उध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

हा उद्योग सुरू झाला तर आमच्या जमिनी नापीक होतील, पाणी दूषित होईल आणि जगण्याचे साधनच हिरावले जाईल, असा आक्रोश शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड असंतोषाची आग भडकली असून वातावरण तापले आहे. या विरोधी आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते तथा विधीज्ञ ॲड.चेतन चिंतामणराव देसाई हे करत असून ते चार दिवसांपासून सोनखेड पांढरी, चुडावा, वाई आणि आसपासच्या गावांमध्ये झंझावाती जनजागृती मोहीम राबवत आहेत.

हा केवळ प्रकल्प नाही तर शेती व्यवस्थेवरचा थेट हल्ला आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे. गणपतराव सूर्यवंशी, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, माऊली सूर्यवंशी, गणपत सूर्यवंशी यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांनी एकत्र येत आता थेट संघर्षाचा पवित्रा घेतला आहे. गावोगावी बैठका, रणनीती ठरवणे आणि मोठ्या आंदोलनाची आखणी सुरू झाली असून आता माघार नाही असा स्पष्ट इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, रेल्वे प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना निवेदन देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून सर्व गावकऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन लवकरच आंदोलनाची अधिकृत घोषणा होणार आहे. आंदोलनाचे स्वरूप मोठे आणि निर्णायक असेल, असे संकेत दिले जात आहेत. दरम्यान, या संपूर्ण वादामुळे पूर्णा परिसरापासून ग्रामीण भागात विकास की विनाश? हा प्रश्न पुन्हा एकदा पेट घेत असून प्रशासन आता नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT