Lack of Rain : परभणी जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीने शेतकरी हवालदिल file photo
परभणी

Lack of Rain : परभणी जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीने शेतकरी हवालदिल

तीस दिवस पावसाचा खंड; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Farmers in Parbhani district distressed by drought-like conditions

परभणी, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात सलग ३० दिवस पावसाचा खंड पडल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून खरीप व बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने शेतनिहाय पंचनामे करून दुष्काळ जाहीर करावा आणि NDRF/SDRF च्या लागू निकषांनुसार आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष, परभणी महानगर एकनाथ दत्तराव चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यांसह केळी, हळद, ऊस व अन्य बागायती पिकांना पाण्याअभावी मोठा फटका बसल्याचे नमूद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून उभी केलेली पिके संकटात आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

नुकसान झालेल्या खरीप व बागायती पिकांचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, केळी, हळद व ऊस यांसारख्या पिकांच्या नुकसानीची स्वतंत्र नोंद घ्यावी, तसेच पात्र शेतकऱ्यांना NDRF/SDRF निकषांनुसार मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय पात्र महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करून सर्व दुष्काळी सवलती लागू कराव्यात, जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी योग्य पद्धतीने रोटेशन करून टेलपर्यंत पोहोचवावे, जळालेल्या डीपी व रोहित्रांची तातडीने बदली करावी आणि सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे.

बाधित शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभतातडीने मिळावा, पीक कर्जवसुलीस स्थगिती देऊन कर्ज पुनर्गठन करावे, तसेच पात्र वंचित शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभद्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या गावांमध्ये तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

शेतकऱ्यांवर दुहेरी संकट असून परिस्थितीचे मूल्यांकन करून प्रत्यक्ष मदत पोहोचवावी, अशी भूमिका अजय चव्हाण यांच्यासह एकनाथ दत्तराव चव्हाण यांनी मांडली आहे. या निवेदनावर उमेश देशमुख-मिरखेलकर, मितेश सुक्रे, रामभाऊ सुक्रे, मुक्तेश्वर देशमुख, शेख सुलतान, मारुती जाधव उपसरपंच, संजय राठोड, सचिन सोलकर, राजुदास पवार, श्याम सकनुर, धर्मराज सुक्रे आर्दी उपस्थिती होती.

सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, केळी, हळद व ऊस उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून निकषांनुसार मदत, दुष्काळ जाहीर करणे, जायकवाडीच्या डाव्या कालव्याचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचविणे, सुरळीत वीजपुरवठा व पीकविम्याचा तातडीने लाभ देण्याची मागणी पं. स. सभापती रवि उत्तमराव चव्हाण यांच्यासह जांब महसूल मंडळ, परभणी तालुक्यातील सरपंच, शेतकऱ्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT