Manwat Tehsil Farm Laborers Protest
मानवत : मानवत शहरासह तालुक्यातील शेतमजूर आणि इतर ग्रामीण कामगारांना दुष्काळी श्रम नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी ३० हजार रुपये तात्काळ देण्यात यावेत, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शेतमजूर व इतर ग्रामीण मजूर युनियन लालबावटा यांच्या वतीने मंगळवारी (दि. १७) मानवत येथील तहसील कार्यालयासमोर सुमारे चार तास धरणे आंदोलन करण्यात आले.
यंदा अतिवृष्टीमुळे मानवत तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिणामी शेतातील कामे ठप्प झाल्याने शेतमजुरांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. त्यामुळे शेतमजुरांना ३० हजार रुपये श्रम नुकसान भरपाई द्यावी, रेशनकार्ड देऊन धान्य पुरवठा करावा, स्मार्ट मीटर सक्तीने बसविणे थांबवावे, मानवत शहरातील नळपट्टी, घरपट्टी व वीजबिल माफ करावे, घरकुल योजनेचे थकीत हप्ते तात्काळ वितरित करावेत, ‘लाडकी बहिण’ योजना सर्वांसाठी लागू करावी, तसेच शेतमजूर, वयोवृद्ध, विधवा आणि श्रावणबाळ लाभार्थ्यांना दिव्यांगांप्रमाणे अनुदान देऊन मागील थकीत रक्कम अदा करावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
याशिवाय गालिब नगर परिसरातील नाल्याचे व पुलाचे बांधकाम पूर्ण करावे, उर्वरित नाले बांधावेत, रस्त्यावरील विद्युत खांब बाजूला हलवून त्यावर दिवे बसवावेत, घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना नियमानुसार पाच ब्रास वाळू मोफत द्यावी, ग्रामजी कायदा रद्द करून मनरेगा कायदा पूर्णपणे लागू करावा, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन निवेदन स्वीकारले व मागण्यांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनात रामराजे महाडिक, रामकृष्ण शेरे, इंदुमती महाडिक, जफरुलाल पठाण, उमेश महाडिक, कुंडलिक थिटे, रुक्मिणी शिंदे, युनुस कुरेशी, रामेश्वर जाधव, सुमेरा अन्सारी, कांताबाई भदर्गे यांच्यासह महिला व पुरुष मजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.