Pathri 132 KV substation explosion
मानवत : पाथरी येथील एमएसईबीच्या 132 केव्ही वीज केंद्रात करंट ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्याने मानवत, पाथरी शहर व तालुक्यातील गावे तसेच सेलू तालुक्यातील काही भाग अशा एकूण अडीच तालुक्यांतील वीजपुरवठा खंडित झाला. गुरुवारी (दि. 23) रात्री पावणे दहापासून ते शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजेपर्यंत तब्बल नऊ तास नागरिकांना अंधारात राहावे लागले.
या घटनेमुळे उन्हाळ्यातील तीव्र उकाड्यात नागरिकांचे मोठे हाल झाले. सध्या 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमान असल्याने वीज नसल्यामुळे अनेकांची रात्र झोपेशिवाय गेली.
मिळालेल्या माहितीनुसार, पाथरी येथील 132 केव्ही केंद्रात अचानक करंट ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा ठप्प होऊन व्यापक प्रमाणात वीजपुरवठा बंद पडला. ही घटना वीज यंत्रणा जुनी झाल्यामुळे घडल्याची शक्यता व्यक्त होत असून, आधुनिक प्रणाली उभारण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच परभणी येथील महापारेषणची दुरुस्ती पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रात्रभर प्रयत्न करून त्यांनी वीजपुरवठा पूर्ववत करण्यास मदत केली.
दरम्यान, पर्यायी व्यवस्था म्हणून माजलगाव येथून वीजपुरवठा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र उन्हाळ्यामुळे तेथेही लोड जास्त असल्याने ही व्यवस्था शक्य झाली नाही, अशी माहिती महावितरणचे मानवत येथील अभियंता विशाल चापके यांनी दिली.