परभणी, पुढारी वृत्तसेवा : वसमत रस्त्यावरील राजगोपालचारी उद्यान समोरील कौटुंबिक न्यायालयातील मीटर रूममध्ये शनिवारी (दि.२०) दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानक स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीने काही क्षणांतच परिसरात खळबळ उडवून दिली. मात्र कार्यकर्त्यांच्या वेळीच तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.
कौटुंबिक न्यायालयातील सदर लागलेल्या आगीच्या घटनेनंतर न्यायालय परिसरात काही काळासाठी अफरातफरीचे वातावरण निर्माण झाले. आगीची माहिती मिळताच सुमित परिहार, अर्जुन रेंगे, करण गायकवाड व प्रज्वल गायकवाड हे चार कार्यकर्ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रसंगावधान राखून न्यायालयातील न्यायाधीश तसेच इतर सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर विजेचा मुख्य प्रवाह तातडीने खंडित करण्यात आला होता.
या आगीचे लोण न्यायालयाच्या इतन भागात पसरू नये यासाठी 'फायन वॉल'च्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आल होता.
दरम्यान, घटनेची माहित मिळताच अग्निशमन दलाची दोन वाहने तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यातील जवानांनी आगीवन नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते. या घटनेमुळे न्यायालयातील कामकाज काह काळासाठी ठप्प झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल नाही, मात्र मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केल जात आहे.