

पूर्णा : तालुक्यातील चुडावा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कावलगाव शिवारात शुक्रवारी (दि.१९) एका अनोळखी वयोवृद्ध (अंदाजे वय-५५ ते ६० वर्षे) ईसमाचा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान पोलिस पाटील अविनाश वंजे यांनी दिलेल्या माहितीवरून चुडावा पोलिस ठाण्यात सदर घटनेची नोंद झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील चुडावा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कावलगाव येथील शेतकरी नारायण मारोतराव पिसाळ यांच्या अद्रकीच्या शेतात चिखलात पडलेला मृतदेह आढळला आहे. दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी, पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे.
सदरील अनोळखी मयत ईसमाचा रंग काळा सावळा, अंगात धोतर कमीज, डाव हात ताटलेला, उजवा हात दिसून येत नसून चिखलात फसलेला पाय शरिराशी दुमडलेले, पायात काळे बुट, पूर्ण शरिरावर मुंग्या लागलेल्या अवस्थेत आढळला आहे. सदरील वर्णनाचा मयत ईसम कोणाचा नातेवाईक असल्यास चुडावा पोलिस ठाण्यातील सपोनि किनगे ७५८८०६८१७०, पोउनि मुखेडकर ८३०८८४०८६३ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, सदर ईसमाने आत्महत्या केली की त्याचा कोणी घातपात केला? याचा उलगडा पोलिस तपासानंतर निष्पन्न होणार असून या घटनेमुळे शेतकऱ्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.