Gangakhed Dussehra Rathotsav route change
गंगाखेड : गंगाखेड तालुक्यासह जिल्हाभरातून लाखो भाविक दरवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने होणाऱ्या रथोत्सवाचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहतात. मात्र, यंदा गोदावरी नदीच्या महापुरामुळे रथोत्सव होईल की नाही, याबाबत भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
बालाजी मंदिर समितीच्या वतीने मात्र स्पष्ट करण्यात आले आहे की, रथोत्सव ठराविक वेळेनुसारच पार पडणार असून केवळ महापुरामुळे मार्गात बदल करण्यात आला आहे.
गंगाखेड येथील सातशे वर्षांची परंपरा असलेल्या दसरा महोत्सवांतर्गत विजयादशमीच्या दिवशी रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाही रथोत्सव दुपारी १:३० वाजता बालाजी मंदिरातून निघणार आहे. दरवर्षीच्या नेहमीच्या मार्गाऐवजी यंदा रथ संत जनाबाई मंदिराजवळील गोरक्षण येथे थांबेल.
यानंतर पारंपरिक पद्धतीनुसार, श्री बालाजीची मूर्ती घोडा या वहनावर घेऊन पुढील कार्यक्रम पार पडतील. सर्व धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रम पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच पार पडणार असल्याचे मंदिर समितीने जाहीर केले असून, भाविकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे.