Purna illegal meat shop doctor hunger strike
पूर्णा : शहरातील प्रसिद्ध डॉक्टर एन. एन. जुंजारे यांनी आपल्या घर आणि दवाखान्याच्या शेजारी गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या बेकायदेशीर मांस विक्री दुकानाविरोधात अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. आजपासून (दि.१४) नगरपालिका कार्यालयासमोर भरपावसात ते उपोषणाला बसले आहेत.
या दुकानातील कोंबड्याचे रक्त आणि दुर्गंधीयुक्त अवशेषांमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महंमद शाहेद महम्मद ताहेर कुरेशी यांनी हे दुकान सन २०२२ पासून उघड्यावर आणि बेकायदेशीरपणे चालवले आहे. नागरिकांनी आणि डॉ. जुंजारे यांनी वारंवार पालिका प्रशासनाकडे तक्रार केली, निवेदन दिले, परंतु प्रशासनाने केवळ औपचारिक कारवाई करून दुकानदारास मूकसंमती दिल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
डॉ. जुंजारे यांनी न्यायालयातही दावा दाखल केला होता. न्यायालयाने स्पष्टपणे दुकान बंद करण्याचे आदेश दिले, तरीही दुकानदाराने आदेश झुगारून मांस विक्री सुरूच ठेवली आहे. अखेर कंटाळून डॉ. जुंजारे यांनी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला बेमुदत अमरण उपोषण सुरू केले आहे. “जोपर्यंत बेकायदेशीर मांस विक्री दुकान बंद करून सिल केले जात नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक मुंमतजीत यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली, मात्र डॉ. जुंजारे यांनी ठामपणे दुकान आधी सिल करण्याची मागणी केली. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि मित्रमंडळानेही प्रशासनाकडे या विषयाचे गांभीर्य मांडले. एसडीएम डापकर आणि सीईओ गुट्टे यांच्याकडे याबाबत तक्रार करण्यात आली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार दुकान सिल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.