तरुणाच्या मारहाण निषेधार्थ धनगर समाजाचा आक्रोश मोर्चा pudhari photo
परभणी

Dhangar protest march : तरुणाच्या मारहाण निषेधार्थ धनगर समाजाचा आक्रोश मोर्चा

आंदोलकांनी महेश बिडगर यांच्यावर दाखल ॲट्रॉसिटीचा गुन्हा खोटा असल्याचा आरोप करत तो तातडीने मागे घेण्याची मागणी केली.

पुढारी वृत्तसेवा

गंगाखेड : सोशल मीडियावरील एका व्हिडिओतील वक्तव्याचा विपर्यास करून तालुक्‍यातील अकोली येथील महेश बिडगर या तरुणाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मारहाण झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी (दि.११) शहरात धनगर समाजाने भव्य आक्रोश मोर्चा काढला. मोर्चात हजारो समाजबांधव सहभागी होते. तसेच विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही मोर्चाला पाठिंबा दर्शविला.

महेश बिडगर यांच्या सोशल मीडियावरील व्हिडिओतील एका वक्‍तव्‍याचा विपर्यास करून काही समाजकंटकांनी त्यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. मोर्चा दरम्यान आंदोलकांनी महेश बिडगर यांच्यावर दाखल ॲट्रॉसिटीचा गुन्हा खोटा असल्याचा आरोप करत तो तातडीने मागे घेण्याची मागणी केली.

तसेच घटना घडताना बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप करत संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच या संपूर्ण प्रकरणामागील सूत्रधारांचाही शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. घटनेच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलिस अधीक्षक तानाजी चिखले यांनी गंगाखेड ठाण्यात तळ ठोकला. आंदोलकांनी मारहाण झालेल्या युवकाचा पुरवणी जबाब नोंदवून तपासाची व्याप्ती वाढविण्याचीही मागणी केली.

मोर्चात गणेश हाके, दीपक बोराडे, माजी आ.मधुसूदन केंद्रे, माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे, माजी जि.प.सदस्य भगवान सानप, जि.प.सदस्य राजेश फड, पवन करवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मिथिलेश केंद्रे, नगरसेवक क्षितिज चौधरी, भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, शिवसेना तालुकाप्रमुख शाहूराव मुंडे, विविध पक्षांचे पदाधिकारी, धनगर समाजबांधव उपस्थित होते.

दोषी आढळल्‍यास कारवाई होणार

अतिरिक्त पोलिस अधीक्षक तानाजी चिखले यांनी आंदोलकांना सांगितले की, घटना घडली त्यावेळी डॉ.आंबेडकर पुतळा परिसरात पोलिस कर्मचारी उपस्थित होते का, याची चौकशी सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, तपासात जो कोणी दोषी आढळेल त्‍यातील कोणतीही गय न करता कारवाई करण्यात येईल. दोषी पोलिस कर्मचाऱ्यालाही पाठीशी घातले जाणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT