Damage in Dharmapuri due to water entering the fields
परभणी, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील धर्मापुरी येथे शनिवारी (दि.२६) झालेल्या मुसळधार पावसामुळे शिवारातील गट क्रमांक ४० मध्ये ५० शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. सरस्वती कन्स्ट्रक्शन कंपनीकडून परभणी-जिंतूर रोडवरील धर्मापूरी शिवारात सुरू असलेल्या नवीन बायपास पुल कामामुळे नैसर्गिक पाण्याचा प्रवाह थांबला आणि ते शेतांत गेल्याने पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रविवारी (दि. २७) हे बायपासचे काम बंद पाडले.
पावसाच्या पाण्यामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी धर्मापूरी येथील ग्रामपंचायतचे सदस्य, महसूल अधिकारी, संबंधित पंच घटनास्थळी पोहचले होते. पंचनाम्यात नमूद केल्याप्रमाणे सदरील तयार करण्यात येणाऱ्या बायपास पुलाजवळील तीन शेतकऱ्यांचे शेत पूर्णतः आणि इतर ५० शेतकरी अंशतः बाधित झाले आहेत. साचलेल्या पाण्यामुळे सोयाबीन, तूर, मका आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
शेतकर्यांनी यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली. जोपर्यंत नुकसान भरपाई दिली जात नाही, तोपर्यंत शेतात साचलेले पाणी काढू देणार नाही, असा ठाम पावित्रा त्यांनी घेतला. घटनास्थळी आलेल्या सरस्वती कंपनीच्या मॅनेजरने हे साचलेले पाणी तातडीने काढून टाकण्यात येईल आणि नुकसानीचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केला जाईल, असे आश्वासन दिले. धर्मापूरी गावातील महसूल व मंडळ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची लेखी हमी मागितली. आणखी पाऊस झाल्यास बाधित क्षेत्र वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
चाकूर, पुढारी वृत्तसेवा: चाकूर शहर व परिसरात तीन दिवसांपासून पाऊसाच्या संततधारामुळे पिकांना जीवदान मिळाले असून शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण दिसत असल्याने शेतकरी सुखावला आहे.
जूनमध्ये उशिरा शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या खऱ्या. परंतु पावसाने दडी मारल्यामुळे पिकांची वाढ खुंटली होती, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, बुधवारी २३ जुलैपासून शनिवार दुपारपर्यंत पडलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाल्याने, शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. सोयाबीन, उडीद, मूग, तुरी, ज्वारी आदी पिकांना जीवदान मिळाले आहे. तालुक्यात यावर्षी सोयाबीन पिकांचा सर्वाधिक पेरा आहे. पिकांसाठी वातावरण बऱ्यापैकी असल्यामुळे तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे.