परभणी : तालुक्यातील जांब महसूल मंडळात शनिवारी अचानक भीषण चक्रीवादळ, गारपीट आणि मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजविला. अवघ्या काही मिनिटांच्या या नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असून संत्रा बागा, सोलार पंप, शेडनेट, पॉलीहाऊस, टिनशेड आणि वीज यंत्रणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अभूतपूर्व संकटामुळे जांब महसूल मंडळातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांनी माजी जि.प.सदस्य बाळासाहेब रेंगे यांच्या नेतृत्वात सोमवारी (दि.8) जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तातडीच्या मदतीसाठी धाव घेत निवेदन दिले.
जांब महसूल मंडळातील जांब, आळंद, गव्हा, पान्हेरा, मांडाखळी, डफवाडी, उमरी, बाभुळगाव आणि मोहपुरी या गावांना चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यांनी रौद्ररूप धारण केले. त्यानंतर गारपीट आणि ढगफुटीसदृश मुसळधार पावसाने परिसराला अक्षरशः झोडपून काढले. प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर शेतीमधील संरक्षक बांधकामे जमीनदोस्त झाली.
या भागात मोठ्या प्रमाणावर संत्रा बागांची लागवड करण्यात आली असून सध्या अंबिया बहारावरील फळधारणा सुरू आहे. मात्र चक्रीवादळामुळे लाखोंच्या संत्रा उत्पादनाचे नुकसान झाले आहे. झाडांवरील कच्च्या फळांची मोठ्या प्रमाणात गळ झाली असून अनेक शेतकऱ्यांची दहा-दहा वर्षे जोपासलेली संत्रा झाडे मुळासकट उन्मळून पडली आहेत. त्यामुळे आगामी हंगामातील उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संत्रा बागांबरोबरच शेतकऱ्यांच्या शेतातील टिनशेड, पत्र्याची गोदामे, शेतमाल साठवणुकीची ठिकाणे आणि इतर बांधकामांचेही मोठे नुकसान झाले.
अनेक ठिकाणी पत्रे उडून गेली असून संरचना पूर्णपणे कोसळल्या आहेत. तसेच शेतांमध्ये उभारण्यात आलेल्या सौरऊर्जा पंपांच्या पॅनल्स वादळी वाऱ्यामुळे तुटून किंवा उडून गेल्या. त्यामुळे सिंचन व्यवस्था विस्कळीत झाली असून शेतकऱ्यांसमोर नव्या संकटाची भर पडली. शेडनेट व पॉलीहाऊस धारक शेतकऱ्यांनाही या आपत्तीचा मोठा फटका बसला. अनेक शेडनेट फाटून गेली असून पॉली हाऊसची संरचना कोलमडून पडली.
लाखोंची गुंतवणूक करून उभारलेले हे प्रकल्प एका क्षणात उद्ध्वस्त झाल्याने संबंधित शेतकरी हवालदिल झाले. चक्रीवादळामुळे अनेक गावांतील वीज यंत्रणाही बाधित झाली. विजखांब, रोहित्रे आणि विजतारा कोसळल्यामुळे काही भागात वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनाही विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याप्रकरणी पंचनामे करावेत अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर बाळासाहेब रेंगे, रमेश लाड, मनेश यादव, परमेश्वर रेंगे, कैलास टेकाळे, विजय लाड, दिपक लाड, नाथराव मेटे, दिनेश टेकाळे, श्रीधर पाते, बळीराम रेंगे, गोपाळ मोरे, प्रभाकर रेंगे, कदीरभाई पठाण यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संत्रा बागांचे नुकसान, फळगळ, उन्मळून पडलेली झाडे, सोलार पंप, टिनशेड, शेडनेट व पॉलीहाऊस यांचे संयुक्त पंचनामे करून शासनाकडून विशेष आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. तसेच महावितरण आणि महापारेषण विभागाला तत्काळ दुरुस्तीचे आदेश देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याचीही मागणी निवेदनातून केली. दरम्यान, शासनाने तातडीने मदत न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे. जांब महसूल मंडळातील शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करीत असून शासनाच्या मदतीकडे त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.