Census Preparations | जनगणना तयारी सुरू Pudhari File Photo
परभणी

Census News : उन्हाळ्यात जनगणना; शिक्षकांचा सुट्ट्यांचा बेत हुकला

मुख्यालय न सोडण्याचे आदेश, प्रशासनाकडून प्रशिक्षणाला सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

Census During Summer; Teachers' vacation plans missed

परभणी पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिक्षकांच्या अपेक्षांवर जनगणनेच्या कामामुळे विरजण पडणार असल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्ह्यातील शाळांचे चालू शैक्षणिक वर्ष दि. ३० मार्च रोजी संपत असून दि.२ मेपासून उन्हाळी सुट्ट्या लागू होणार आहेत. मात्र १६ मे ते १५ जून या कालावधीत देशव्यापी डिजिटल जनगणना पार पडणार असल्याने शिक्षकांना या कालावधीत मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई करण्यात आल्याने त्यांचा उन्हाळ्यातील सुट्टी घेवून विश्रांतीचा बेत हुकल्याचे बोलले जात आहे.

यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल पध्दतीने होणार असून त्यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षणही दिले जाणार आहे. त्यामुळे सुट्ट्यांचा मोठा कालावधी हा प्रत्यक्षात शासकीय कामातच जाणार आहे. मागील दोन वर्षांत लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सातत्याने गुंतलेल्या शिक्षकांना यंदा सुट्यांमध्ये काहीसा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा वाटत होती.

मात्र जनगणनेच्या कामामुळे त्यांच्या विश्रांतीच्या आशांवर पाणी फिरले आहे. दरम्यान, अनेक शिक्षकांनी या दीर्घ सुट्ट्यांच्या काळात देवदर्शन, पर्यटन सहली, कौटुंबिक कार्यक्रम तसेच लग्न कार्यांचे नियोजन केलेले होते. परंतु मुख्यालय न सोडण्याच्या आदेशांमुळे हे सर्व बेत रद्द किंवा पुढे ढकलण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरलेले दिसून येत आहे. यावर्षी २६ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार असल्याने शिक्षकांना सलग सुट्टीचा लाभ मिळण्याची शक्यता जवळपास नाही. परिणामी, उन्हाळ्याचा संपूर्ण कालावधी हा राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यातच जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या काळात काम करणाऱ्या शिक्षकांना बदली रजा किंवा विशेष सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून जोर धरत आहे. काही शिक्षकांकडून या कामातून सुटका मिळविण्याचे मार्ग शोधले जात असले तरी बहुतांश शिक्षक हे जबाबदारीने जनगणनेचे काम पार पाडण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. एकूणच यंदाचा उन्हाळा शिक्षकांसाठी विश्रांतीपेक्षा कर्तव्यनिष्ठेचा ठरणार असून जनगणना मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी त्यांना पुन्हा एकदा पुढे यावे लागणार आहे.

जनगणना कक्षाचे उद्घाटन

जिल्हयात जनगणना - २०२७ चे काम यशस्वी व वेळेत होण्यासाठी आवश्यक पूर्व तयारी अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन सभागृहात सोमवारी तीन दिवसीय प्रशिक्षणास जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेत प्रारंभझाला. तत्पूर्वी स्थापन केलेल्या जनगणना कक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन केले. प्रशिक्षणास निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, जीवराज डापकर, संगीता चव्हाण, प्रशिक्षक जनगणना संचालनालय सहायक संचालक सुनिल आत्राम, जिल्हा समन्वयक संजय नाईक, संदीप कुलकर्णी आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT