Pangra Barbadi Cattle Attack Pudhari
परभणी

Cattle Attack Purna | पांगरा येथे गोठ्यातील जनावरांवर हल्ला; लोखंडी रॉड हळदीच्या शेतात आढळला, आरोपींचा कसून शोध

दोन जनावरे ठार, अन्य जनावरे गंभीर जखमी; फॉरेन्सिक आणि श्वान पथकाकडून घटनास्थळाची तपासणी, शेतकरी कुटुंब भयभीत

पुढारी वृत्तसेवा

Pangra Barbadi Cattle Attack

पूर्णा : पूर्णा तालुक्यातील पांगरा-बरबडी शिवारातील शेतात गोठ्यात बांधलेल्या पशुधनावर अज्ञात व्यक्तींनी लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रांनी क्रूर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात दोन जनावरे ठार झाली असून, गाय आणि म्हशींना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत असून, हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी केली जात आहे.

पांगरा-बरबडी शिवारातील अखाड्यावर शेतकरी आनंदा नागोराव ढोणे आणि गोविंद भाऊराव ढोणे यांच्या गोठ्यात दुभती जनावरे बांधलेली होती. अज्ञात व्यक्तींनी या जनावरांवर हल्ला केला. काही जनावरांच्या गुप्तांगात लोखंडी रॉड घालून त्यांना गंभीर जखमी करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेतील गंभीर जखमी म्हशीवर पशुधन विकास अधिकारी डॉ. कसबे यांनी उपचार केले. मात्र, उपचारानंतरही जनावरांची प्रकृती सुधारलेली नसल्याने आणि ती अन्न-पाणी घेत नसल्याने शेतकरी कुटुंब चिंतेत आहे. जखमी जनावरे दगावण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

या अमानुष घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. मुक्या प्राण्यांवर अशा प्रकारे हल्ला करणाऱ्या आरोपींना तातडीने शोधून अटक करावी, अशी मागणी होत आहे.

फॉरेन्सिक आणि श्वान पथकाकडून तपासणी

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली चुडावा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी सिंगनवाड व त्यांचे पथक तपास करत आहे.

२५ ऑक्टोबर रोजी दुपारनंतर घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबचे पथक आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. दोन्ही पथकांनी गोठा आणि परिसराची पाहणी करून पुरावे गोळा केले. यावेळी हल्ल्यात वापरण्यात आल्याचा संशय असलेला लोखंडी रॉड हळदीच्या शेतात आढळून आला.

फॉरेन्सिक आणि श्वान पथकाच्या तपासणी अहवालांसह अन्य तपासाच्या आधारे आरोपींचा शोध वेगाने सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कुंदनकुमार वाघमारे यांनी ‘दै. पुढारी’शी बोलताना दिली. तपासासाठी आवश्यकतेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचीही मदत घेतली जाण्याची शक्यता आहे.

शेतकरी कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी

गोठ्यात बांधलेल्या जनावरांवर झालेल्या या हल्ल्यामुळे संबंधित शेतकरी कुटुंब भयभीत झाले आहे. पशुधनावर हल्ला करणाऱ्या व्यक्तींकडून भविष्यात शेतकरी कुटुंबाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आरोपींना तातडीने अटक करण्याबरोबरच संबंधित शेतकरी कुटुंबाला पोलिसांकडून संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT