मानवत, पुढारी वृत्तसेवा : मानवत पोलिसांनी तंबाखूजन्य पदार्थाची विक्री केल्याप्रकरणी 25 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या एका मृत व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचा अजब प्रकार घडला आहे. याची चर्चा परिसरात होत आहे. (Parbhani Manwat Police)
याबाबत माहिती अशी की, मानवत तालुक्यातील रत्नापूर येथील जिल्हा परिषद शाळेजवळ तंबाखूजन्य पदार्थ विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी 1 एप्रिल रोजी पान शॉप चालकाविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिस हवालदार शेख गाझीयोद्दीन शेख हबीब उर्फ मन्नू यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीत रामकृष्ण बलभीम ताकट (रा. रत्नापूर) हा गावातील जिल्हा परिषद शाळा परिसरात त्याच्या पान शॉप मध्ये तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करीत असताना आढळून आला असल्याचे म्हटले आहे.
यावेळी आरोपीकडून २५० रुपयांचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आल्याचेही म्हटले आहे. याप्रकरणी ज्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोप ठेवण्यात आले आहेत. त्या व्यक्तीने फेब्रुवारी १९९७ रोजी आत्महत्या केली असल्याची माहिती असून तसे दस्त ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध आहेत, अशा या गजब प्रकाराची चर्चा शहरात होत आहे.
याप्रकरणी घटनास्थळी पंचनामा करताना आरोपीने आपले नाव रामकृष्ण ताकट असल्याचे सांगितल्याने एफआयआर मध्ये तसा उल्लेख आला आहे. चौकशी दरम्यान तसेच अटक फॉर्म भरताना आधारकार्ड मागणी केली असता त्या आरोपीचे नाव शेख साजिद शेख जलाल (वय 55, रा. रत्नापूर) असल्याचे समजले, अशी माहिती तपास अधिकारी नारायण सोळंके यांनी दिली. या प्रकरणात एफआयआर मध्ये वेगळे नाव आले असले, तरी चार्जशीट दाखल होताना शेख साजिद हे नाव राहणार आहे, असे समजते.