Parbhani News : मोहखेड तांड्यात गांजाची शेती; कोटींवर मुद्देमाल जप्त file photo
परभणी

Parbhani News : मोहखेड तांड्यात गांजाची शेती; कोटींवर मुद्देमाल जप्त

अमली पदार्थांविरोधात पथकाची कारवाई; शेत ठोक्याने घेऊन लागवड केल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

Cannabis cultivation in Mohkhed Tanda; contraband worth crores seized

जिंतूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील मोहखेड तांडा परिसरात शेतात चक्क गांजाची लागवड करून त्याची जोपासना होत असल्याचा प्रकार अमली पदार्थविरोधी पथकाच्या कारवाईत उघडकीस आला. गुप्त माहितीच्या आधारे पथकाने शेतावर छापा टाकत तब्बल १०९ गांजाची झाडे जप्त केली. जप्त गांजाच्या झाडांचे वजन २४२ किलो ३०० ग्रॅम असून, त्याची किंमत तब्बल १ कोटी २१ लाख १५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी परमेश्वर रामा चांदणे (रा. मोहखेड तांडा, ता. जिंतूर) याच्याविरुद्ध जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शेत ठोक्याने घेऊन त्यामध्ये गांजाची लागवड केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहखेड येथील शेतकरी कैलास सखाराम राठोड यांच्या गट क्रमांक २६ मधील शेतजमीन परमेश्वर चांदणे याने ठोक्याने घेतली होती.

या शेतात गांजाची लागवड करून त्याची जोपासना केली जात असल्याची गोपनीय माहिती अंमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली. पथकाने संबंधित शेताची पाहणी करून कारवाईची तयारी केली. गोपनीय माहितीची खातरजमा केल्यानंतर पथकाने मोहखेड तांडा परिसरातील संबंधित शेतावर छापा टाकला. यावेळी शेतात गांजाची झाडे लागवड केलेली आढळून आली. पोलिसांनी कारवाई करत एकूण १०९ झाडे ताब्यात घेतली.

या झाडांचे वजन केल्यानंतर ते २४२ किलो ३०० ग्रॅम भरले. जप्त मुद्देमालाची किंमत १ कोटी २१ लाख १५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले. शेतजमीन ठोक्याने घेऊन त्यामध्ये गांजाची लागवड व जोपासना केल्याच्या आरोपावरून परमेश्वर चांदणे याच्याविरुद्ध जिंतूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिसांकडून सुरू आहे.

गांजाची लागवड करण्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे. अंमली पदार्थांची लागवड, साठवणूक, विक्री आणि तस्करीला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच मोहिमेचा भाग म्हणून मोहखेड तांडा परिसरातील ही कारवाई करण्यात आली. ग्रामीण भागातील शेतजमिनींचा गैरवापर करून अमली पदार्थांची लागवड केली जात असल्यास त्याची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

अंमली पदार्थाच्या विळख्यातून समाजाला वाचविण्यासाठी मोहीम सुरूच राहणार असून, अंमली पदार्थांचा नायनाट करणे हेच ध्येय आहे, असा निर्धार पोलिस प्रशासनाने व्यक्त केला. विशेष पोलिस महानिरीक्षक ज्योतिप्रिया सिंग, पोलिस अधीक्षक अजित टिके, पोलिस अधीक्षक अनुज तारे आणि पोलिस उपअधीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनात कारवाई झाली. पोनि दिगंबर कोपरे, पोउपनि नितीन पवार, पोलिस उपनिरीक्षक संतोष वावळ, हनुमंत जकवेवाड, पिराजी निळे, प्रशांत कोकंडे, काशिनाथ कुंडगीर, रोहित मगर, विकास तायडे, शंकर कोस्वेवाड, गणेश जाधव, महेंद्र दासरवार, तानाजी येळगे आणि शेख मुजीब यांनी कारवाईत सहभाग घेतला.

१०९ झाडे... २४२ किलो ३०० ग्रॅम गांजा

मोहखेड तांडा परिसरातील शेतातून अंमली पदार्थविरोधी पथकाने १०९ गांजाची झाडे जप्त केली. या झाडांचे एकूण वजन २४२ किलो ३०० ग्रॅम, तर जप्त मुद्देमालाची किंमत १ कोटी २१ लाख १५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतजमिनींचा अमली पदार्थांच्या लागवडीसाठी होणारा वापर हा चिंतेचा विषय ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT