Kanadkhed boy drowned in Purna river
पूर्णा: पूर्णा तालुक्यातील कानडखेड क्रमांक १ येथील इयत्ता सहावी वर्गात शिकणारा अजय अशोक वैद्य (वय१३ ) मंगळवारी (दि. ६) सकाळी पूर्णा नदीकाठी शेळ्या चारायला गेला होता. तो पाणी पिण्यासाठी नदीकिनारी गेला असता पाय घसरुन नदीतील पाण्यात पडून बुडाला होता. काहींनी तो पोहत होता, असेही सांगितले होते. दरम्यान, आज (दि. ७) सकाळी त्याचा मृतदेह पुलाखाली तरंगत असलेला एका शेतक-याला दिसून आला. पोलीस, महसूल, आपत्ती व्यवस्थापन टीमने मृतदेह पाण्याबाहेर काढला.
बुडालेला मुलाचा शोध घेण्यासाठी महसूल, पोलिस, आपत्ती व्यवस्थापन टीम शर्थीचे प्रयत्न करत होती. परंतु, त्याचा मंगळवारी रात्री उशिरा पर्यंत थांगपत्ता लागला नव्हता. अखेर त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना एका शेतकऱ्याला आढळून आला. शवविच्छेदनानंतर शोकाकुल वातावरणात मुलाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे कानडखेड गावावर शोककळा पसरली आहे.
अजय वैद्य हा अतिशय गरीब कुटुंबातील विद्यार्थी होता. तो सुट्टीत रखरखत्या उन्हात शेळ्या चारायचे काम करायचा. अजय वैद्य याच्या मृत्युची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास जमादार मुजमुले करीत आहेत.
दरम्यान, पूर्णा नदीपात्रात बॉम्बे पुलाशेजारी काही वाळूमाफीयांनी अवैध वाळू उत्खनन करुन चोरट्या मार्गाने गाढवावरुन रेती वाहतूक करत होते. त्यामुळे नदीपात्रात वाळू उपशामुळे मोठे खड्डे तयार झाले आहेत. मृत मुलगा खड्ड्यात जावून बुडाल्याने घुटमळला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.