सुभाष कच्छवे
परभणी : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सय्यद इकबाल यांच्या रूपाने परभणीत मुस्लिम चेहऱ्याला महापौरपदाची संधी दिल्यानंतर राज्यभरात भाजपकडून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न होत असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी एकमेकांवर झाडल्या जात आहेत.
गुरुवारी परभणीत महापौर- उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली. यात उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सय्यद इकबाल या मुस्लिम चेहऱ्याला महापौरपदाची संधी दिल्यानंतर राज्यभरात भाजपकडून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न सुरू असून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना लक्ष केल्या जात असल्याचे दिसून येत आहे. महापौरपदाच्या निवडीवरून परभणीची चर्चा मात्र राज्यभरात होताना दिसून येत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांना लक्ष्य करत 2019 मध्ये ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडल्यामुळे आम्ही वेगळा विचार केला असे वक्तव्य केले आहे. भाजपच्या चित्रा वाघ, नवनाथ बन यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनीही मुस्लिम महापौर दिल्याबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या टीकेला उत्तर देताना खा.संजय राऊत यांनी देशाचा राष्ट्रपती मुस्लिम होऊ शकतो, लष्करप्रमुख मुस्लिम होऊ शकतो, तर महापौर मुस्लिम झाला तर भाजपचे पोटशूळ का उठले असा सवाल केला आहे. भाजपच्या टीकेला उत्तर देताना खा.संजय जाधव म्हणाले की, भाजपने आम्हाला शहाणपण शिकवू नये, भाजपला अकोट, अचलपूरमध्ये एमएमआयएमसोबत युती चालते, तर परभणीत मुस्लिम महापौर दिला तर भाजपच्या पोटात का दुखत आहे.
भाजपने आम्हाला शहाणपण शिकवू नये, असा इशारा देत खा.जाधव यांनी कोण किती हिंदुत्ववादी आहे हे समोरासमोर या दाखवून देऊ असा इशाराही त्यांनी भाजपला दिला आहे. एकंदरीत मागील 30 वर्षांपासून परभणीत खान पाहिजे की बाण असा प्रचार व्हायचा, आता त्यात शिवसेनेने मुस्लिम महापौर दिल्यामुळे भाजपकडून राज्यभरात शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न होत आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही भाजपवर पलटवार करत जशास तसे उत्तर दिले आहे.
मुस्लिम मतांची परतफेड
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मुस्लिमबहुल प्रभागातून भरभरून मतदान झाले होते. विधानसभा निवडणुकीत आ.डॉ.राहुल पाटील यांनाही मुस्लिमबहुल प्रभागातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य होते. मनपा निवडणुकीत उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 25 नगरसेवक निवडून आले असून त्यामध्ये 13 मुस्लिम नगरसेवकांचा समावेश आहे.
परभणीत सय्यद इकबाल यांच्यारूपाने ठाकरे यांच्या शिवसेनेने मुस्लिम चेहरा देऊन लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ठाकरे यांच्या शिवसेनेला झालेल्या मतदानाची परतफेड केल्याचे चित्र आहे. मुस्लिम महापौर देण्यावरून भाजप आणि ठाकरे यांच्या शिवसेनेत मात्र चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे चित्र राज्यभरात पहावयास मिळत आहे.