ST Reservation : एसटी आरक्षणासाठी बंजारा समाजाचे तिरडी आंदोलन file photo
परभणी

ST Reservation : एसटी आरक्षणासाठी बंजारा समाजाचे तिरडी आंदोलन

१४ दिवसांपासून उपोषण; शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी, तहसीलदारांना निवेदन

पुढारी वृत्तसेवा

Banjara community's tirdi procession' protest for ST reservation

जिंतूर, पुढारी वृत्तसेवा : बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जिंतूर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला शनिवारी आक्रमक वळण मिळाले. १४ दिवसांपासून आंदोलन सुरू असूनही शासनाकडून ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप करीत बंजारा समाजाच्या वतीने शासनाच्या निषेधार्थ तिरडी आंदोलन करण्यात आले. यावेळी आरक्षण मागणीसह शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली.

स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळा परिसरातून तिरडी आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलक तिरडी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे तहसील कार्यालयाकडे खाना झाले. यावेळी आंदोलकांनी बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळालेच पाहिजे, तसेच शासनाने आंदोलनाची तातडीने दखल घ्यावी, अशा घोषणा दिल्या. शासनाच्या भूमिकेचा निषेध करणाऱ्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. तहसील कार्यालयात गेल्यानंतर शिष्टमंडळाने नायब तहसीलदार प्रशांत राखे यांना निवेदन दिले.

बंजारा समाजाच्या एसटी आरक्षण मागणीवर शासनाने तातडीने कार्यवाही करावी, घटनात्मक, कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रियेबाबत शासनाने अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, जिंतूर येथे ५ सप्टेंबरपासून बसलेल्या विनोद आडे यांच्या उपोषणाची तातडीने दखल घेऊन चर्चा सुरू करावी, अशी मागणी केली.

मुख्यमंत्री यांच्यासोबत बंजारा समाजाचे प्रतिनिधी, आंदोलनाचे पदाधिकारी आणि कायदेशीर तज्ज्ञांच्या शिष्टमंडळाची बैठक आयोजित करून आरक्षणाबाबत शासनाची भूमिका स्पष्ट करावी, अशीही मागणी केली. आंदोलनाशी संबंधित आडे, अॅड. विनोद राठोड, विजय आढे, विशाल चव्हाण यांच्यासह इतर आंदोलकांवर दाखल गुन्ह्यांची निष्पक्ष चौकशी व कायदेशीर पुनर्तपासणी करावी.

तपासात गुन्हे चुकीच्या माहितीच्या आधारे दाखल झाल्याचे निष्पन्न झाल्यास ते कायद्यानुसार मागे घेण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी केली. आरक्षण आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना शासनाने मदत करावी, तसेच पात्र कुटुंबीयांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत विशेष निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली. दरम्यान आरक्षणाचा अंतिम निर्णय होईपर्यंत विद्यार्थ्यांसाठी सर्व शैक्षणिक सवलती द्याव्यात. तसेच शासन आणि आंदोलकांमध्ये संवाद साधण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी. आणि कार्यवाहीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT