April's Ration Supply Stalled; 45 Shops Without Grain
जिंतूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील तब्बल ४५ स्वस्त धान्य दुकाने एप्रिल महिन्यापासून शासनाच्या धान्य पुरवठ्याअभावी रिकामी पडली. अनेक गावांतील हजारो रेशनधारक नागरिकांना अन्नधान्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. शासनाने तीव्र उष्णतेची लाट लक्षात घेता लाभार्थ्यांना तीन महिन्यांचे रेशन एकत्र देण्याचे आदेश दिले. मात्र प्रत्यक्षात एप्रिलचे धान्यच उपलब्ध न झाल्याने शासनाच्या आदेशांची अंमलबजावणी कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे.
मे महिन्यात तापमानाचा पारा चढलेला असताना ग्रामीण भागातील गरीब व सर्वसामान्य नागरिकांना रेशनसाठी वारंवार दुकानांवर चकरा माराव्या लागत आहेत. धान्य आलेले नाही, गोदामातून पुरवठा झाला नाही अशी उत्तरे दुकानदारांकडून दिली जात असल्याने लाभार्थ्यांत संतापाची भावना निर्माण झाली. विशेषतः अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील नागरिकांचे हाल होत आहेत. शासनाने उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी वितरित करण्याचा निर्णय घेतला. मात्र तालुक्यातील अनेक दुकानांवर एप्रिलचे रेशनच न पोहचल्याने लाभार्थ्यांना शासनाच्या घोषणांचा कोणताही फायदा झालेला नाही.
जिंतूर तालुक्यातील वडी, वांघी, धानोरा, बोरगळवाडी, हनवतखेडा, कावी, कोरवाडी, कुंभेफळ, कोळपा, बामणी बु., चौधरनी, कवठा बदनापूर, संक्राळा, अंबरवाडी, करंजी, सावरगाव तांडा, सावरगाव, गारखेडा, अंगलगाव, धमधम, कोठा, कुऱ्हाडी, दहेगाव, अंगलगाव तांडा, सावंगी भांबळे, उंब्रज, डोंगरतळा, घेवडा, भिलज, सुकळीवाडी, पांगरी, असोला तांडा, कवडा, दाभा-दिग्रस, वसा, हांडी, वझर बु., घागरा, धानोरा बु. आणि खरदडी या गावांत एप्रिलचे रेशन अद्यापही पोहोचले नसल्याची माहिती समोर आली.
त्यामुळे या गावांतील नागरिकांत तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले. अनेक गावांत महिला लहान मुलांसह रेशन दुकानांवर तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. रेशन कधी मिळणार याची कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नाही. प्रत्येक वेळी फक्त उद्याची तारीख दिली जाते, अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान, रेशन दुकानदारांनीही पुरवठा विभागाकडून धान्य वेळेत उपलब्ध होत नसल्याचे सांगितले. रखडलेला धान्य पुरवठा त्वरित सुरू करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काही ग्रामस्थ व रेशनधारकांनी दिला आहे.
उन्हाची तीव्रता शासनाने स्वतःच तीन महिन्यांचे रेशन एकत्र देण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रत्यक्षात एप्रिल महिन्याचे धान्यही अद्याप मिळालेले नाही. शासनाच्या घोषणांचा फक्त गाजावाजा होत असून गरीब नागरिकांना मात्र उपाशीपोटी दिवस काढावे लागत आहेत. शासनाने स्वतःच्या निर्णयाचीच पायमल्ली केली असून, आता तरी तत्काळ धान्य पुरवठा करून नागरिकांना दिलासा द्यावा.शतल चव्हाण, रेशन धारक महिला, सावरगाव तांडा