एप्रिल महिन्याचे रेशन रखडले; जिंतूर तालुक्यातील ४५ दुकाने धान्याविना

Parbhani News | उन्हाच्या तीव्र लाटेत नागरिकांची परवड; शासनाच्या तीन महिन्यांच्या रेशन आदेशालाही हरताळ
एप्रिल महिन्याचे रेशन रखडले; जिंतूर तालुक्यातील ४५ दुकाने धान्याविना
Published on
Updated on

जिंतूर: तालुक्यातील तब्बल ४५ स्वस्त धान्य दुकाने एप्रिल महिन्यापासून शासनाच्या धान्य पुरवठ्याअभावी रिकामी पडली असून, अनेक गावांतील हजारो रेशनधारक नागरिकांना अन्नधान्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. शासनाने तीव्र उष्णतेची लाट लक्षात घेता लाभार्थ्यांना तीन महिन्यांचे रेशन एकत्रित देण्याचे आदेश दिले होते. मात्र प्रत्यक्षात एप्रिल महिन्याचे धान्यच उपलब्ध न झाल्याने शासनाच्या आदेशांची अंमलबजावणी कागदावरच राहिल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

मे महिन्यात तापमानाचा पारा चढलेला असताना ग्रामीण भागातील गरीब व सर्वसामान्य नागरिकांना रेशनसाठी वारंवार दुकानांवर चकरा माराव्या लागत आहेत. “धान्य आलेले नाही”, “गोदामातून पुरवठा झालेला नाही” अशी उत्तरे दुकानदारांकडून दिली जात असल्याने लाभार्थ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

विशेषतः अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील नागरिकांचे हाल होत आहेत. शासनाने उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी वितरित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जिंतूर तालुक्यातील अनेक दुकानांवर एप्रिल महिन्याचे रेशनच न पोहोचल्याने लाभार्थ्यांना शासनाच्या घोषणांचा कोणताही फायदा झालेला नाही.

तालुक्यातील वडी, वांघी, धानोरा, बोरगळवाडी, हनवतखेडा, कावी, कोरवाडी, कुंभेफळ, कोळपा, बामणी बु., चौधरनी, कवठा बदनापूर, संक्राळा, अंबरवाडी, करंजी, सावरगाव तांडा, सावरगाव, गारखेडा, अंगलगाव, धमधम, कोठा, कुऱ्हाडी, दहेगाव, अंगलगाव तांडा, सावंगी भांबळे, उंब्रज, डोंगरतळा, घेवडा, भिलज, सुकळीवाडी, पांगरी, असोला तांडा, कवडा, दाभा-दिग्रस, वसा, हांडी, वझर बु., घागरा, धानोरा बु. आणि खरदडी या गावांमध्ये एप्रिल महिन्याचे रेशन अद्यापही पोहोचले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या गावांतील नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अनेक गावांमध्ये महिला लहान मुलांसह रेशन दुकानांवर तासन्तास प्रतीक्षा करत असून, रिकाम्या हाताने परतण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. “रेशन कधी मिळणार याची कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नाही. प्रत्येक वेळी फक्त उद्याची तारीख दिली जाते,” अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान, रेशन दुकानदारांनीही पुरवठा विभागाकडून धान्य वेळेवर उपलब्ध होत नसल्याचे सांगितले.

गोदामातून पुरवठा रखडल्याने दुकानदारांनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. तालुक्यात निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीकडे जिल्हा प्रशासन व अन्न नागरी पुरवठा विभागाने तातडीने लक्ष देऊन रखडलेला धान्य पुरवठा त्वरित सुरू करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काही ग्रामस्थ व रेशनधारकांनी दिला आहे.

“उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे शासनाने स्वतःच तीन महिन्यांचे रेशन एकत्रित देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रत्यक्षात एप्रिल महिन्याचे धान्यही अद्याप मिळालेले नाही. शासनाच्या घोषणांचा फक्त गाजावाजा होत असून गरीब नागरिकांना मात्र उपाशीपोटी दिवस काढावे लागत आहेत. शासनाने स्वतःच्या निर्णयाचीच पायमल्ली केली असून, आता तरी तात्काळ धान्य पुरवठा करून नागरिकांना दिलासा द्यावा.”

रेशन धारक सौ.शितल चव्हाण, सावरगाव तांडा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news