Parbhani News : १२ हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार कृषी शास्त्रज्ञ  File Photo
परभणी

Parbhani News : १२ हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार कृषी शास्त्रज्ञ

विकसित कृषी संकल्प अभियानास मोठा प्रतिसाद, परभणीत दोन टीम

पुढारी वृत्तसेवा

Agricultural scientists will reach 12,000 farmers

परभणी : पुढारी वृत्तसेवा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात अलीकडेच विकसित कृषी संकल्प अभियानाचा शुभारंभ झाला. या अभियानांतर्गत १२ जूनपर्यंत जिल्ह्यातील ९० गावांमध्ये कृषी शास्त्रज्ञ १२ हजार शेतकर्यांच्या बांधावर पोहचणार असून कृषी संदर्भात विविध समस्यांची सोडवणूक करणार आहेत.

शेती क्षेत्रांतील विविध आव्हानांना सामोरे जाण्यासह वातावरणातील बदल व अन्य गोष्टीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी २९ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विकसित कृषी संकल्प अभियानाचा शुभारंभकरण्यात आला. अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या संशोधन संस्था, विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणार आहेत. २९ मेपासून कृषी विज्ञान केंद्राच्या ८ शास्त्रज्ञ असलेल्या दोन टीम रोज ६ गावांमध्ये जात आहेत.

याशिवाय केंद्राच्या निंबुवर्गीय संशोधन संस्थेचे नागपूर येथील ४ शास्त्रज्ञ निंबुवर्गीय फळ पिकांवरील रोगाचा प्रादुर्भाव व अन्य समस्यांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. तब्बल १५ दिवस ते जिल्ह्यामध्ये तळ ठोकणार आहेत.

या अभियानात आधुनिक तंत्रज्ञान, कृषी यांत्रिकीकरण, कोरडवाहू तंत्रज्ञान, नैसर्गिक शेतीबाबत प्रचार व प्रसार, फळे व फुलशेतीला प्रोत्साहन देण्याबरोबरच जमिनीचे आरोग्य सुध ारण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग केले, त्याची माहिती घेऊन कृषी शास्त्रज्ञ हे वरिष्ठांना पाठवत त्याचा दस्ताऐवज करणार आहेत. खरीप पेरणी संदभनि नवीन वाण, बीज प्रक्रिया, नैसर्गिक शेतीविषयीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत परभणी तालुक्यातील पेडगाव येथे विद्यापीठ कुलगुरू डॉ. इंद्र मणि यांनी शेतकऱ्यांना ड्रोनविषयक माहिती दिली.

शेतकऱ्यांनाही दिलासा या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहोत. त्यांच्या शेतीशी संबंधित विविध समस्या समजावून घेत आहोत. शेतकरीही चिकित्सकपणे प्रश्न विचारत आहेत. त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत कृषी शास्त्रज्ञ-संशोधकांकडून समाधानकारक उत्तरे दिली जात आहेत. एकंदरीत या अभियानामुळे शेतकर्यांनाही दिलासा मिळाला आहे, अशी माहिती वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत भोसले यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT