परभणी जिल्ह्यातील तीन तालुक्यांच्या क्रीडा संकुलांना अखेर प्रशासकीय मंजुरी file photo
परभणी

Sports Complex : परभणी जिल्ह्यातील तीन तालुक्यांच्या क्रीडा संकुलांना अखेर प्रशासकीय मंजुरी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश; क्रीडा संकुलांच्या कामांना मिळणार गती

पुढारी वृत्तसेवा

Administrative approval finally granted for sports complexes in three talukas of Parbhani district

परभणी, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील सोनपेठ आणि मानवत येथील तालुका क्रीडा संकुल, तसेच परभणी येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या रखडलेल्या प्रस्तावांना अखेर आज प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. पाथरी येथील तालुका क्रीडा संकुलाला जागेच्या उपलब्धतेनुसार तत्वतः प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. जिल्ह्यातील या क्रीडा संकुलांच्या कामांना गती देण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा क्रीडा मंत्री सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी मुंबईतील बैठकीत दिले.

क्रीडा संकुलांची निर्मिती आणि सुविधांच्या विकासात निधीची कमतरता भासू नये, तसेच उपलब्ध निधीचा योग्य विनियोग व्हावा, या उद्देशाने उपमुख्यमंत्र्यांनी हे महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. या बैठकीत परभणी जिल्ह्यातील सोनपेठ, मानवत आणि पाथरी या तालुका क्रीडा संकुलांचे तसेच परभणी येथील जिल्हा क्रीडा संकुलाचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते.

शासकीय नियमानुसार ५ कोटी रुपयांच्या अनुदानाच्या मर्यादेत बसत असल्याने सोनपेठ आणि मानवत तालुका संकुलांना बैठकीतच अंतिम प्रशासकीय मान्यता देण्यात आली. पाथरी येथे पाटबंधारे विभागाच्या जागेची हस्तांतरण प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याने, जागा मिळविण्याच्या अटीस अधीन राहून तत्वतः मान्यता देण्यात आल्याचे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.

परभणी येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या अद्ययावत उभारणीसाठी १५ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीला क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, क्रीडा व युवक सेवा आयुक्त दीपक सिंगला, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजे यांच्यासह वित्त, नियोजन, नगर विकास-२, महसूल आणि क्रीडा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

क्रीडा संकुल निर्मितीसाठी मंजूर झालेला निधी दीर्घकाळ खर्चाविना पडून असल्यास, तो संबंधित समित्यांकडून त्वरित परत घेण्यात यावा. हा अखर्चित निधी ज्या क्रीडा संकुलांना निधीची नितांत गरज आहे, तिथे तातडीने पुनर्वितरित करावा, असे कडक निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT