A piece of twine was found in a dal fry in Parbhani
परभणी, पुढारी वृत्तसेवा : शहरातील नारायण चाळ भागातील प्रसिध्द समजल्या जाणाऱ्या हॉटेल राधिका पॅलेसमध्ये रविवारी (दि.२०) एक धक्कादायक प्रकार घडला. नक्षत्र प्रेम सहाय्यता समुह गटातील सदस्यांना प्युअर व्हेज म्हणून दिलेल्या दाल तडक्यात सुतळीचा तोडा निघाल्याने फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केला. याबद्दल ग्राहकामध्ये संतापाची लाट उसळली. असे प्रकार हॉटेलांत सर्रास घडत असतानाही अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सदरील घटना रविवारी दुपारी घडली. संबंधित ग्राहकाने जेवण सुरू केल्यानंतर काही वेळातच त्याच्या वाटीत सुतळीचा गुच्छा आढळल्याचे उघड झाले. ही बाब हॉटेल व्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप संबंधित ग्राहकांनी केला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून सोशल मीडियावर या घटनेचा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
प्युअर व्हेज असा दावा करणाऱ्या हॉटेलमध्ये असा गलथानपणा होणे, ही ग्राहकांची फसवणूक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. या प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची टीका नागरिक करत आहेत. यापूर्वीही शहरातील काही हॉटेल्समधून अशा प्रकारच्या तक्रारी संबंधित अन्न व औषध प्रशासनाकडे झाल्याचे बोलले जाते. मात्र त्या हॉटेल व्यवस्थापनावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी या प्रकाराकडे लक्ष देवून ठोस कार्यवाही करण्याची गरज बनली आहे.
परभणी शहरातील नामांकित हॉटेलांत बहुतांश वेळा निकृष्ट दर्जाचे अन्न ग्राहकांच्या माथी मारल्या जात असल्याची ओरड होत आहे. काही कालावधीपुर्वी पत्रकारांनीही निरज इंटरनॅशनल या हॉटेलातील खानावळीबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाकडे भ्रमणश्चवनीवरून तक्रार दाखल केली होती.
पण त्यावरही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही अथवा त्या अन्नाची तपासणीही करण्यात आली नाही. यामुळे अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनी खात्रीशीर, स्वच्छ व दर्जेदार जेवणाचे ठिकाणच निवडावे, तसेच अशा प्रकारांबाबत तात्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन आरोग्यविषयक जागरूक नागरिकांकडून करण्यात येत आहे.