पालकमंत्री मेघना बोर्डीकर pudhari photo
परभणी

Guardian Minister Bordikar : परभणीच्या विकासाला उद्योगांचा बुस्टर डोस

१,६२२ कोटींची गुंतवणूक; १५ हजारांवर रोजगार, दसऱ्यापर्यंत उद्योगाची पायाभरणी : पालकमंत्री बोर्डीकर

पुढारी वृत्तसेवा

A 'Booster Dose' of Industries for Parbhani's Development

परभणी, पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देणारी मोठी घोषणा इन्व्हेस्ट इन परभणी गुंतवणूक परिषदेत करण्यात आली. जिल्ह्यात विविध उद्योगांच्या माध्यमातून 1 हजार 622 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक होणार असून, या माध्यमातून तब्बल 15 हजार 617 स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या गुंतवणुकीसाठी 162 उद्योजकांशी सामंजस्य करार केले. दसऱ्यापर्यंत संबंधित उद्योगांच्या इमारत कामाची पायाभरणी करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.

जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित इन्व्हेस्ट इन परभणी गुंतवणूक परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी खा. रामराव वडकुते, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, सहायक आयुक्त संजय भुरेवाल, सहायक आयुक्त अमोल बळे, सहायक उद्योग अधिकारी प्रभाकर वटाणे यांच्यासह विविध क्षेत्रांतील उद्योजक उपस्थित होते.

पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्य विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. या विकास प्रक्रियेत जिल्ह्यानेही सक्रिय सहभाग नोंदविण्याची गरज आहे. आपण म्हणू तशी परभणी घडवायची असून, प्रत्येक क्षेत्रात जिल्ह्याला अग्रेसर करण्यासाठी शासन, प्रशासन, उद्योजक, युवक आणि नागरिकांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

स्थानिक उद्योजकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या माध्यमातून जिल्ह्यात गुंतवणूक वाढविण्यावर भर असून, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सुमारे 80 हजार नोंदणी झाल्याचेही त्यांनी सांगितले. उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, वित्तपुरवठा, अनुदान आणि पात्रतेबाबत उद्योजकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

विविध परवानग्यांची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एकखिडकी पद्धतीचा अवलंब करण्यात येणार असून, ईज ऑफ डुईंग बिझनेस धोरण प्रभावीपणे राबविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. परभणीत नियोजन भवनासह नवे उद्योग भवन उभारण्यात येणार आहे. उद्योग उभारणीसाठी आवश्यक परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याबरोबरच उद्योजकांच्या अडचणींचा नियमित आढावा घेतला जाईल.

यामुळे उद्योग सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. परभणीचे प्रमुख सामर्थ्य असलेल्या कृषी क्षेत्राला उद्योगांची जोड देण्याची गरज आहे. जिल्ह्यात तेलबियांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. त्यावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया उद्योग उभारल्यास उत्पादनाचे मूल्यवर्धन होऊन रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील. अकुशल मनुष्यबळाला प्रशिक्षण देऊन कुशल मनुष्यबळ तयार केले जाईल.

त्यातून नवनवीन प्रक्रिया उद्योग उभारून परभणीतील उत्पादनाला देशासह जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे. परभणीत शोध, नवोपक्रम, उष्मायन आणि प्रशिक्षण केंद्र अर्थात सीआयआयआयटी उभारण्याचे नियोजन असून, त्यातून नवउद्योजकांना तंत्रज्ञान व प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. भविष्यातील ऊर्जेची गरज लक्षात घेता परभणीत पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीसाठी अनुकूल वातावरण आहे.

महाराष्ट्र सौरऊर्जा निर्मितीत अग्रेसर असून, या क्षेत्रात परभणीनेही महत्त्वाची भूमिका बजावावी, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. सुषमा मोरथानिया यांनी एक जिल्हा, एक उत्पादन संकल्पनेतून परभणीच्या उत्पादनाला स्वतंत्र ओळख मिळवून देण्याची गरज व्यक्त केली. वसमतच्या हळदी प्रमाणे परभणीतील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना भौगोलिक मानांकन मिळवून जागतिक बाजारपेठ काबीजसाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले. जागतिक बाजारपेठेचा अभ्यास करून त्यानुसार उत्पादन, मार्केटिंग आणि ई-बाजारपेठेत नोंदणी करण्याचे आवाहन केले. खा. वडकुते यांनी परराज्यातील काही गुंतवणूकदारही परभणीत गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. सूत्रसंचलन श्रीकांत मानोलीकर तर आभार अनुप शुक्ला यांनी मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT