

परभणी : शहरात गेल्या काही महिन्यांपासून घरफोड्या आणि चोरीच्या घटनांनी धुमाकूळ घातला आहे. बंद घरे हेरून चोरटे सर्रासपणे डल्ला मारत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे जिल्हा पोलीस प्रशासनाकडून १ ऑगस्टपासून ‘चोरीमुक्त परभणी’ अभियान राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे, तर दुसरीकडे शहरातील एका मोठ्या दरोड्याच्या प्रकरणाचा सहा महिन्यांनंतरही तपास लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या गस्तीपासून तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेपर्यंत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहरातील सहकारनगर परिसरातील रहिवासी आणि पेडगाव येथील प्रतिष्ठित नागरिक कपिल देशमुख यांच्या बंद घराला ९ जानेवारी रोजी चोरट्यांनी लक्ष्य केले होते. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत ऐवज लंपास केला. या प्रकरणी देशमुख यांनी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा आणि स्मरणपत्रे देऊनही तपासात ठोस प्रगती झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सहकारनगरमधील या घटनेनंतरही शहरातील विविध भागांत चोरीच्या घटना सुरूच आहेत. मागील आठवड्यात तसेच अलीकडे शहरातील दोन ते तीन ठिकाणी घरफोड्या झाल्याची माहिती समोर आली आहे. बंद घरे हेरून त्यांना लक्ष्य करणार्या चोरट्यांचे धाडस वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. निवासी भागांत रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त कितपत प्रभावी आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वारंवार चोरीच्या घटना घडत असतानाही चोरट्यांना पोलिसांचा धाक उरला नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे रात्रीची गस्त वाढविणे, संशयित व्यक्ती व वाहनांची तपासणी करणे, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करणे तसेच पूर्वीच्या गुन्ह्यांतील आरोपींची धरपकड करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
कपिल देशमुख यांच्या सहकारनगर येथील घरावर झालेल्या मोठ्या दरोड्याला तब्बल सहा महिने उलटले आहेत. मात्र, अद्याप या प्रकरणातून कोणताही ठोस निष्कर्ष समोर आलेला नसल्याची तक्रार देशमुख यांनी केली आहे. दरोड्याचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास तातडीने स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवावा, अशी मागणी त्यांनी पोलीस अधीक्षक तसेच आयजी उमाप यांच्याकडे केली होती. मात्र, अद्याप अपेक्षित पातळीवर कारवाई झालेली नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दरोड्याच्या तपासासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री, आयजी, डीजीपी आणि पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना आतापर्यंत किमान सात पत्रे दिली आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही तपासात ठोस काहीही निष्पन्न झालेले नाही, असा आरोप कपिल देशमुख यांनी केला. नानलपेठ पोलिस ठाण्याच्या तपासाबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. एवढ्या गंभीर गुन्ह्याच्या तपासाला विलंब होत असल्याने संबंधित यंत्रणेने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून तपासाची दिशा स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मोठ्या दरोड्याचा तातडीने तपास करून आरोपींचा शोध घ्यावा, यासाठी विविध लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घेतल्याचे देशमुख यांनी सांगितले. यवतमाळचे खासदार संजय देशमुख, खासदार संजय जाधव, माजी मंत्री वरपूडकर, कृषीभूषण कांतराव झरीकर आदींनी पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून, वरिष्ठ पातळीवरून या तपासाचा आढावा घेण्याची मागणी होत आहे.
रखडलेल्या तपासाबाबत परभणीतील सदानंद धामणे आणि धनंजय चौधरी यांनी सोशल मीडियावरून तीव्र शब्दांत आवाज उठवला आहे. मोठ्या दरोड्याचा तपास अद्याप का लागला नाही, असा सवाल उपस्थित करणारी त्यांची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी १ ऑगस्टपासून ‘चोरीमुक्त परभणी’ अभियान राबविण्याचे आवाहन केले आहे. चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम हाती घेणे ही सकारात्मक बाब असली तरी, यापूर्वी घडलेल्या गंभीर चोरी आणि दरोड्यांच्या प्रकरणांचा तपास पूर्ण करून आरोपींना गजाआड करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यामुळे रखडलेल्या मोठ्या दरोड्याचा तपास मार्गी लावून नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास कायम ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.