872 ration cards found ineligible; action taken under 'Mission Sudhar' campaign
सोनपेठ, पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणून पात्र लाभार्थ्यांनाच शासकीय धान्याचा लाभ मिळावा, यासाठी राबविण्यात येत असलेल्या मिशन सुधार अभियानांतर्गत तालुक्यातील सोनपेठ 872 शिधापत्रिकाधारक अपात्र ठरले आहेत. या लाभार्थ्यांचे शासकीय धान्य वितरण बंद केले असून, त्यांचा समावेश पांढऱ्या रेशनकार्ड किंवा विना प्राधान्य योजनेच्या श्रेणीत होणार असल्याची माहिती तहसीलदार सुनील कावरखे यांनी दिली.
सोनपेठ शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात एकूण 75 स्वस्तधान्य दुकाने आहेत. या दुकानांमार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना, अंत्योदय योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना गहू, तांदूळ यांसह विविध अन्नधान्याचे वितरण होते. या योजनांचा लाभखऱ्या गरजूंपर्यंत पोहोचावा, यासाठी प्रशासनाकडून शिधापत्रिकांची तपासणी व पडताळणी होत आहे.
तालुक्यात पात्र प्राधान्य कुटुंब, अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेंतर्गत एकूण 16 हजार शिधापत्रिकाधारकांचा समावेश आहे. त्यापैकी तपासणी दरम्यान विविध कारणांमुळे शिधापत्रिकाधारक अपात्र आढळले. यात मृत लाभार्थ्यांची 154 प्रकरणे, दुहेरी नाव नोंदणीची 112 प्रकरणे, 897 872 उच्च उत्पन्न गटातील 441 लाभार्थी, दीर्घकाळ धान्य न घेणारे 115 लाभार्थी, तर इतर त्रुटींशी संबंधित 50 प्रकरणांचा समावेश आहे.
मिशन सुधार अभियानांतर्गत प्रशासनाकडून शिधापत्रिकाधारकांच्या पात्रतेची व्यापक तपासणी होत आहे. यात एकापेक्षा अधिक रेशनकार्ड असणे, दुहेरी नावनोंदणी, कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नातील विसंगती, रेशनकार्ड व ई-केवायसीमधील त्रुटी, चारचाकी वाहनांची मालकी तसेच कुटुंबातील सदस्यांकडून आयकर विवरणपत्र दाखल होते का, यांसह विविध निकषांची पडताळणी करण्यात येत आहे. यात अपात्र लाभार्थ्यांचे शासकीय धान्य वितरण बंद केले.
तसेच आगामी काळातही ही मोहीम सुरू राहणार असून, आणखी काही शिधापत्रिकाधारक अपात्र ठरण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली. स्वस्त धान्य दुकानांमार्फत पात्र लाभार्थी व गरजू कुटुंबांनाच शासकीय योजनांचा लाभ मिळावा, हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे. मिशन सुधार अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती तहसीलदार कावरखे, पुरवठा निरीक्षक संदीप जाधव यांनी दिली.