48 scientists interact with more than 972 farmers
परभणी, पुढारी वृत्तसेवा :
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत कुलगुरू प्रा. डॉ. इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून व विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनात माझा एक दिवस माझ्या बळीर ाजासोबत हा अभिनव उपक्रम मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत दि.११ जून रोजी राबविण्यात आला. उपक्रमांतर्गत विद्यापीठाच्या १६ विभागांतील एकूण ४८ शास्त्रज्ञांनी १९ गावांत जाऊन ९७२ हून अधिक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.
शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रक्षेत्र भेटी, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके व शेतकरी मेळावे घेतले. या संवादातून शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यावर मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्ह्यातील आव्हई (ता. पूर्णा) येथे उपक्रमाचा मुख्य कार्यक्रम झाला. यात कुलगुरू प्रा. डॉ. इन्द्र मणि हे ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यापीठाला भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय कृषी शिक्षण अधिस्वीकृती समितीकडून प्राप्त ए ग्रेड मानांकन (३.२१ गुण) शेतकरी व विद्यार्थ्यांना समर्पित करताना विद्यापीठ हे शाश्वत शेती, नव्याने विकसित तंत्रज्ञान व शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कटिबध्द असल्याचे सांगितले. कार्यक्रमास गावचे उपसरपंच गिरी, डॉ. राकेश अहिरे, डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. प्रशांत भोसले, डॉ. दिगंबर पटाईत, डॉ. गजानन गडदे, डॉ. चंद्रशेखर आंबडकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात शेतकऱ्यांनी विशेषतः हळद पिकात बुरशीजन्य रोग, कंदकुज व करपा या समस्यांचा उल्लेख केला. त्यावर जैविक उपाययोजना, बियाणे प्रक्रिया, माती परीक्षणावर शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. विद्यापीठाने विकसित केलेल्या 'बायोमिक्स' व 'ट्रायकोडर्मा' यांसारख्या जैविक घटकांचा वापर रासायनिक खतांपेक्षा फायदेशीर ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. अहिरे यांनी अभियानामार्फत दररोज ६ गावांत शास्त्रज्ञांची टीम पाठविली जात असल्याचे सांगितले. डॉ. देशमुख यांनी शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद या उपक्रमाची माहिती दिली, जो दर मंगळवारी व शुक्रवारी शेतकऱ्यांसाठी आयोजित केला जातो.
डॉ. भोसले यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देत शेतकऱ्यांना लाभघेण्याचे आवाहन केले. शेतकरी जळबाजी बुचाले यांनी स्वतःचा अनुभव सांगताना माती तपासणी व महा विस्तार एआय अॅपचा उपयोग कसा फायदेशीर ठरत आहे, हे उघड केले. 'माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत' या उपक्रमाने शेतकरी-शाखज्ञ संवादाच्या दालनात एक नवा मापदंड निर्माण केला असून, शेतीत नवकल्पना व आधुनिक तंत्रज्ञान पोहचविण्याचे उद्दिष्ट बळकट केले.
नांदगाव येथे झालेल्या दुसऱ्या कार्यक्रमात संशोधन संचालक डॉ. खिजर वेग, सेंद्रिय शेती केंद्राचे डॉ. आनंद गोरे, डॉ. पपीता गौरखेडे आदींनी शेतकऱ्यांना केळी, ऊस, खजूर या पिकांबाबत मार्गदर्शन केले. पिकांचे नियोजन, जैविक खतांचा वापर, ऊस पाचट व्यवस्थापन, यंत्रसाधनांचा वापर यासारख्या विषयांवर चर्चा झाली.