मराठवाडा

परभणी : रमाई आवास योजनेतील घरकुलाची ३२४ कामे अपूर्ण

मोहन कारंडे

पाथरी; सुधाकर गोंगे : राज्य शासनाने ग्रामीण भागातील मागासवर्गीय बेघर कुटुंबाला आपले हक्काचे घर मिळावे यासाठी 2016 पासून रमाई आवास घरकुल योजना सुरू केली. योजनेची अंमलबजावणी सुरू झाली मात्र मंजूर करण्यात आलेले घरकुल बांधकाम विविध कारणांनी मोठ्या प्रमाणावर अपूर्ण राहत आहेत. पाथरी तालुक्यात पाच वर्षात मंजूर करण्यात आलेल्या 815 घरकुल पैकी तब्बल 324 घरकुल बांधकाम पूर्ण झाली नाहीत.

केंद्र आणि राज्य शासनाकडून बेघर लाभार्थ्यांना विविध योजने अंतर्गत घरकुल मंजूर करण्यात येतात. यापूर्वी इंदिरा आवास, राजीव गांधी आवास योजनेची अंमलबजावणी झाली. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना सूरू करण्यात आली. 2016 साली मागासवर्गीय कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी रमाई आवास योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. दरवर्षी शासनाकडून जिल्हा निहाय उद्दिष्ट ठरवून घरे देण्यात येतात. पुढे तालुका स्तरावर गाव निहाय लोकसंख्या प्रमाणे उद्दिष्ट देण्यात येतात. त्याच प्रमाणे 2016 पासून तालुक्यात गाव निहाय उद्दिष्ट प्रमाणे घरकुल मंजूर करण्यात आली. मात्र कामे वेळेत पूर्ण होत नाहीत त्यासाठी विविध कारणे पुढे येत आहेत.

लाभार्थ्यांमध्ये ऊस तोड आणि इतर मजूर यांचा अधिक समावेश आहे. हे मजूर 6 ते 7 महिने गावाबाहेर राहतात आणि गावात परत आले की घरकुल बांधकामासाठी त्यांना वाळूचा मोठा प्रश्न निर्माण होतो. मात्र महसूल यंत्रणेकडून वाळू उपलब्ध करून दिली जात नाही. त्यामुळे घरकुल बांधकाम अपूर्ण राहत असल्याची माहीती समोर येत आहे.

पाथरी तालुक्यातील घरकुल योजनेतील घरांची स्थिती :

2016-17 या वर्षात 52 घरकुल मंजूर करण्यात आली होती, त्यातील 51 घरकुल पूर्ण झाली आहेत.
2017 – 18 मध्ये 70 घरकुल मंजूर करण्यात आली होती, त्यातील 65 घरकुल पूर्ण झाली आहेत
2018-19 वर्षात 139 घरकुल मंजूर करण्यात आली होती, त्यातील 104 घरकुल पूर्ण झाली आहेत.
2019-20 मध्ये 277 घरकुल मंजूर करण्यात आली होती. त्यातील 191 घरकुल पूर्ण झाले आहेत.
2021-22 मध्ये 277 घरकुल मंजूर करण्यात आली होती. त्यातील 80 घरकुल पूर्ण झाले आहेत.
2016-17 ते 2021-22 या पाच वर्षात तालुक्यात 815 घरकुल मंजूर करण्यात आली आहेत. त्यातील 491 घरकुल बांधकाम पूर्ण झाली आहेत. तर 324 घरकुल अद्याप अपूर्णच आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT