बिलोली, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील सगरोळी येथे वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करताना विजेचा धक्का लागून २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. माधव गंगाधर चावरे असे मृत तरुणाचे नाव आहे. या दुर्घटनेप्रकरणी महावितरणच्या संबंधित कर्मचाऱ्यांसह कनिष्ठ अभियंत्याविरुद्ध बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत तरुणाची आई नंदाबाई गंगाधर चावरे (वय ६०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, माधव हा मागील दोन वर्षांपासून गावातील वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत लाईनमनचे काम करीत होता. शनिवारी सकाळी सगरोळी येथील शारदानगर परिसरात वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. यावेळी माधव वीजखांबावर काम करीत असताना अचानक विजेचा धक्का बसला. तो खाली कोसळला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
वीज दुरुस्तीचे काम सुरू असताना वीजपुरवठा बंद करण्यात आला नव्हता, तसेच कामासाठी आवश्यक सुरक्षा किट व संरक्षणात्मक साधने उपलब्ध करून देण्यात आली नव्हती, असा गंभीर आरोप तक्रारदाराने केला आहे.
या प्रकरणी शिवाजी गोविंदराव मामीलवाड, शिल्पा वाघमारे, शंकर गंगाधर सुरकुटलावार आणि कनिष्ठ अभियंता आकाश चंद्रवंशी यांची नावे तक्रारीत नमूद आहेत. याप्रकरणी बिलोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०६(१), २८९ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुरजकुमार तिडके तपास करत आहेत.
संबंधित कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.दरम्यान, वीज दुरुस्तीच्या कामात सुरक्षा नियमांचे पालन झाले होते की नाही आणि या दुर्घटनेला नेमके कोण जबाबदार आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे सगरोळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.