Young man dies in his sleep due to poisonous snake bite
नायगाव, पुढारी वृत्तसेवा : कोपरा येथील एका चाळीस वर्षीय तरुणाचा झोपेत असताना विषारी सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. साहेबराव डोईवाड (वय ४०) असे या तरुणाचे नाव असून, मंगळवारी (दि. २४) सकाळी ही घटना उघडकीस आली.
२३ जूनच्या रात्री नेहमीप्रमाणे घरात जमिनीवर झोपलेल्या साहेबराव यांना पहाटेच्या सुमारास विषारी सापाने चावा घेतला. तातडीने त्यांना मांजरम येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना पुढे नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात व नंतर मुखेड येथील डॉ. पुंडे यांच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
सर्वत्र प्रयत्न करूनही उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. या घटनेची नोंद मुखेड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. डोईवाड यांच्या निधनामुळे कोपरा गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील व भाऊ असा परिवार आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जन-तेने सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक झाले आहे. प्रशासन व आरोग्य विभागाकडून सर्पदंश प्रतिबंध व त्वरित उपचार याबाबत जनजागृती करण्याची काळाची गरज आहे.