Jairam Dhongde Marathi Translated Book Award
उमरखेड : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आणि भूमिहीन गरीब कुटुंबातून पुढे आलेल्या उमरखेड तालुक्यातील चातारी गावच्या भूमिपुत्राने साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. साहित्यिक, कवी व अनुवादक जयराम नारायण धोंगडे यांनी अनुवादित केलेल्या ‘झुंज कॅन्सरशी’ या ग्रंथाची राज्यस्तरीय 'महामृत्युंजय' वाङ्मयमय पुरस्कार २०२६' साठी निवड झाली आहे. नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली यांच्या वतीने अनुवादित साहित्य गटातून त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हैदराबाद येथील ज्येष्ठ कर्करोगतज्ज्ञ तथा रोबोटिक सर्जन डॉ. सचिन मर्दा यांच्या 'I Am Unstoppable' या गाजलेल्या इंग्रजी पुस्तकाचा जयराम धोंगडे यांनी मराठीत अनुवाद केला आहे. कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी लढा देणाऱ्या रुग्णांना जगण्याची नवी उमेद, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन देणारा हा महत्त्वपूर्ण आशय मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे कार्य त्यांनी या ग्रंथाद्वारे केले आहे.
जयराम धोंगडे यांचे मूळ गाव उमरखेड तालुक्यातील चातारी असून त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण येथेच पूर्ण झाले. अत्यंत हलाखीच्या आणि भूमिहीन कुटुंबात जन्म होऊनही त्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शिक्षण घेतले. आज ते एक संवेदनशील कवी व लेखक म्हणून प्रसिद्ध असून त्यांची ग्रंथसंपदाही मोठी आहे. आपल्या यशासोबतच त्यांनी नेहमीच कुटुंबाला आणि गावाला मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या राज्यस्तरीय यशामुळे चातारी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून तालुक्याचा नावलौकिक उंचावला आहे.
या पुरस्काराचा वितरण सोहळा रविवार, दि. २० डिसेंबर २०२६ रोजी गडचिरोली येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे संयोजक चुडाराम बल्हारपुरे यांनी धोंगडे यांचे अभिनंदन करून पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. धोंगडे यांच्या या यशाबद्दल चातारी ग्रामस्थांसह उमरखेड व नांदेड येथील साहित्यिक, शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.