Crime pudhari photo
नांदेड

Umarkhed Crime | पैशांच्या वादातून शेतकऱ्यावर लोखंडी शॉकअपने हल्ला; जिवे मारण्याची धमकी

उमरखेडमध्ये उधारीच्या पैशांवरून वाद; शेतकरी जखमी, पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Umarkhed Farmer Attacked

उमरखेड : उधारीच्या पैशांच्या वादातून एका शेतकऱ्यावर लोखंडी शॉकअपने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना उमरखेड शहरातील नाग चौक परिसरात शनिवारी (दि. २१) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. यावेळी आरोपीने शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी उमरखेड पोलिस ठाण्यात सय्यद सादिक अब्दुल रहेमान (वय ५५, रा. झाकीर हुसेन वॉर्ड, उमरखेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रहेमतउल्ला कुदरतउल्ला जागीरदार (वय ३२, रा. शाईनगर, उमरखेड) हे नाग चौकातील उजाला ऑटोमोबाईल्स येथे बसले असताना आरोपी तेथे आला. त्याने उधारीच्या पैशांची मागणी करीत व्याजासह संपूर्ण रक्कम तत्काळ देण्याचा तगादा लावला.

यंदा दुष्काळामुळे शेतातील सोयाबीनचे पीक आले नसल्याने संपूर्ण रक्कम देणे शक्य नसल्याचे फिर्यादीने सांगितले. यावरून आरोपीने सर्वांसमक्ष अश्लील शिवीगाळ करीत अपमान केला. त्यानंतर लोखंडी शॉकअपने डोक्यासह शरीराच्या अन्य भागांवर मारहाण केल्याने फिर्यादी जखमी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

याशिवाय रात्री शेताकडे जाताना वाहनाने उडवून देण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. आरोपी अवैध सावकारीचा व्यवसाय करीत असून, त्याच्याकडे गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती असल्याने आपल्या जीवाला धोका असल्याची भीती फिर्यादीने व्यक्त केली आहे. या तक्रारीवरून उमरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास जमादार प्रकाश बोंबले करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT