

यवतमाळ : घाडसी घरफोडी करून चोरट्याने तब्बल 128 ग्रॅम वजनाचे तब्बल साडेपाच लाख रुपयांचे सोने, चांदीचे दागिने लंपास केले. शहरातील गुरुमाऊली सोासयटीत ही घटना उघडकीस आल्यानंतर प्रकाश साधूजी मेंढे यांनी आज शनिवारी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दिली.
प्राप्त माहितीनुसार प्रकाश मेंढे शहरातील उमरसरा परिसरातील गुरूमाऊली सोसायटीत कुटुंबासह राहतात. दरम्यान, मुलगा अनिकेत याला पोहचविण्यासाठी ते कुटुंबासह नागपूर गेले होते. या संधीचा फायदा घेत अनोळखी चोरट्याने त्यांच्या घराचा दरवाजाचा कुलूप कोंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर रूममधील लोखंडी अलमारी फोडून पाच लाख 48 हजार 440 रुपये किमतीच्या सोने, चांदीचा ऐवज लांबविला.
घराचा दरवाजा उघडा दिसल्याने शेजार्याने त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी नागपूरला असल्याचे सांगून आतमध्ये जाऊन पाहण्याची विनंती केली. दरम्यान, शेजारी धनपाल लिंगायत यांनी आत बघितले असता, सर्व साहित्य अस्ताव्यस्त होते. तर आलमार्या फोडलेल्या दिसल्याची माहिती मेंढे यांना दिली. त्यावरून प्रकाश मेंढे यांनी परत येताच शनिवारी अवधूतवाडी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेर्याची पाहणी केली. या प्रकरणी अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा नोंद केला. पुढील तपास ठाणेदार अजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.