Umarkhed Fake Police Robbery Pudhari
नांदेड

Umarkhed Crime | उमरखेडमध्ये पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाचे अडीच लाखांचे सोने लंपास

तोतया पोलिसांचा प्रताप; ८४ वर्षीय वृद्धाला २ लाख ६२ हजारांचा गंडा

पुढारी वृत्तसेवा

Umarkhed Fake Police Robbery

उमरखेड : पोलीस असल्याची बतावणी करून दोन अनोळखी व्यक्तींनी ८४ वर्षीय वृद्धाची फसवणूक करत त्यांच्या जवळील सोन्याच्या दोन अंगठ्या आणि सोन्याची चैन असा एकूण २ लाख ६२ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. ही घटना ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास उमरखेड शहरातील नगरपरिषदेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळील मुख्य रस्त्यावर घडली. या प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राम कोडया कांबळे (वय ८४, रा. सिद्धेश्वर वार्ड, बोरबन, उमरखेड) यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. ते लक्ष्मी भोजनालयाकडून कवडश्या बाबा दर्ग्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याने जात असताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आपण पोलीस असल्याचे भासवून वृद्धाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने घेऊन दोघांनीही घटनास्थळावरून पळ काढला.

३५ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास

फिर्यादीनुसार, चोरीस गेलेल्या ऐवजात १० ग्रॅम वजनाची ७५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, पाच ग्रॅम वजनाची ३७ हजार ५०० रुपये किमतीची दुसरी अंगठी आणि २० ग्रॅम वजनाची सुमारे एक लाख ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन यांचा समावेश आहे. एकूण ३५ ग्रॅम वजनाच्या या दागिन्यांची किंमत २ लाख ६२ हजार ५०० रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

संशयितांच्या वर्णनावरून शोध सुरू

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या संशयिताचे वय अंदाजे ४५ वर्षे असून, त्याचा बांधा धडधाकट आणि रंग साधारण गोरा आहे. त्याने निळ्या-पांढऱ्या रंगाचा चौकडीचा शर्ट, काळसर जिन्स आणि डोक्यावर टोपी घातली होती. दुसऱ्या संशयिताचा बांधा धडधाकट असून, त्याचा रंग सावळा आहे. त्याने फिकट रंगाचा चौकडीचा शर्ट, फिकट काळसर जिन्स आणि डोक्यावर टोपी घातली होती.

या प्रकरणी ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजून २३ मिनिटांनी उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९५७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम २०४, ३१९(२) आणि ३(५) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव पुढील तपास करीत आहेत. वृद्धाची फसवणूक करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या संशयितांचा शोध घेणे आणि चोरीस गेलेला ऐवज हस्तगत करणे, हे पोलिसांसमोरील आव्हान आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT