Red Alert Yavatmal
उमरखेड : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी (दि. ३१) यवतमाळ जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' जारी केला होता. संभाव्य अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. मात्र, दिवसभरात अपेक्षित स्वरूपाचा पाऊस न झाल्याने हवामान विभागाच्या अंदाजाच्या अचूकतेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत.
रेड अलर्टनंतर नागरिकांनी मुसळधार पावसाची तयारी केली होती. मात्र, दिवसभर कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण असे चित्र दिसून आले. अनेक ठिकाणी किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाला, परंतु अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली नाही.
शाळांना अचानक सुट्टी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, पालक, नागरिक आणि विविध क्षेत्रातील नागरिकांनी हवामान विभागाच्या वारंवार चुकणाऱ्या अंदाजांबाबत नाराजी व्यक्त केली. चुकीचे किंवा अतितीव्र इशारे दिल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून, भविष्यात खऱ्या आपत्कालीन परिस्थितीत अशा इशाऱ्यांकडे गांभीर्याने पाहिले जाईल का, अशी चिंताही व्यक्त केली जात आहे.
उपग्रह, डॉपलर रडार आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हवामानाचा अंदाज वर्तविला जात असतानाही स्थानिक पातळीवरील हवामानाचा अचूक अंदाज का चुकतो, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रेड अलर्ट आणि प्रत्यक्ष परिस्थितीतील तफावत कशामुळे निर्माण होते, याबाबत हवामान विभागाने स्पष्ट भूमिका मांडण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून घेतलेल्या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे. संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घेणे हे प्रशासनाचे कर्तव्य असल्याचेही नागरिकांचे मत आहे. मात्र, वारंवार फोल ठरणारे अंदाज प्रशासनालाही अडचणीत आणतात. शाळांना सुट्टी, कामकाजावर होणारा परिणाम, पालकांची गैरसोय आणि नागरिकांमध्ये निर्माण होणारा संभ्रम याची जबाबदारी निश्चित होण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे.
रेड अलर्ट हा नागरिकांना सतर्क करण्यासाठी महत्त्वाचा इशारा असला, तरी तो प्रत्यक्ष परिस्थितीशी सुसंगत असणे आवश्यक आहे. अन्यथा अशा इशाऱ्यांच्या विश्वासार्हतेवर परिणाम होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.