World Literature Conference 2027
संजीव कुळकणीं
नांदेड : २०२७ साली भरणाऱ्या शंभराव्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनापूर्वी साहित्य महामंडळाचे पदाधिकारी आणि सर्व सदस्यांसह ३० साहित्यिकांना येत्या सप्टेंबर महिन्यात विश्व साहित्य संमेलनानिमित्त 'दुबईवारी' घडणार आहे.
मराठी साहित्य महामंडळाच्या शनिवारी कलबुरगी (गुलबर्गा) येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसमोर विश्व साहित्य संमेलनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्याचा तपशील महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी उपस्थित प्रतिनिधींसमोर ठेवला.
त्यानुसार दुबई येथील मराठी मंडळाने वरील संमेलनाचा प्रस्ताव दिला आहे. यानिमित्ताने अन्य तीन-चार आखाती देशांतील मराठीजनांना एकत्र प्रयत्न आणण्याचा संयोजकांकडून सुरू झाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनाही आमंत्रित करण्याचा त्यांचा मानस असून महामंडळाचे पदाधिकारी व सदस्य मिळून १९ प्रतिनिधी आणि ३० निमंत्रित साहित्यिकांच्या प्रवास तसेच इतर खर्चाचा भार उचलण्याची तयारी संयोजकांनी दर्शविली असल्याचे वरील बैठकीमध्ये सांगण्यात आले.
महामंडळाने हा प्रस्ताव स्वीकारला आहे. बैठकीमध्ये कोणीही विश्व साहित्य संमेलनास विरोध केला नाही. दुबईतील संस्थेचे प्रतिनिधी पुढील काळात पुण्यामध्ये येणार असून त्यानंतर नियोजित संमेलनाची रुपरेषा ठरवली जाणार आहे. साहित्य महामंडळाच्या पुढाकारातून विश्व साहित्य संमेलने भरविण्याचा उपक्रम २००९ साली सुरू झाला. २०१५ साली नांदेडचे शेषराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पोर्टब्लेअर (अंदमान) येथे संपन्न झालेल्या संमेलनानंतर मागील १० वर्षांपासून हा उपक्रम थांबला आहे.
महामंडळाच्या कालच्या बैठकीतील हा सर्वात महत्त्वाचा निर्णय असल्याचे एका सदस्याने बैठकीनंतर सांगितले. येत्या जानेवारी महिन्यात सातारा येथे होणाऱ्या ९९व्या साहित्य आणि इतर बाबींवर बैठकीमध्ये चर्चा झाली. शंभरावे साहित्य संमेलन कोठे भरणार, ते अद्याप निश्चित झाले नसले, तरी या संमेलनाचे औचित्य साधून सबंध महाराष्ट्रात तालुकास्तरावर मराठी मेळावे घेणे आणि इतर उपक्रमांसंबंधी महामंडळाध्यक्ष जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर पत्र पाठविले असून ते पत्रच त्यांनी बैठकीसमोर वाचून दाखविले. त्यावर उपस्थितांनी काही सूचनाही केल्या.
९९व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनापासून संमेलनाध्यक्षांच्या अध्यक्षीय भाषणासाठी ३० मिनिटांचा अवधी दिला जाणार आहे, असे सांगण्यात येत आहे. दिल्ली येथे झालेल्या ९८व्या साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी उद्घाटक पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात भाषण केले होते. त्यानंतर मुख्य सोहळ्यातही त्यांनी प्रदीर्घ भाषण केले. या पार्श्वभूमीवर संमेलनाध्यक्षांनी आपले संपूर्ण छापील भाषण न वाचता त्यांतील महत्त्वाच्या मुद्यांच्या अनुषंगाने बोलावे, असे आता ठरविण्यात आले आहे. ज्या साहित्यिक-कवींना यंदाच्या संमेलनातील कार्यक्रमामध्ये संधी दिली जाणार आहे, त्या साहित्यिकांना नंतरची तीन वर्ष संमेलन कार्यक्रमातून दूर ठेवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.