Cartoon Special Article
प्रशांत भागवत
उमरखेड : समाजातील विसंगती, राजकारणातील विरोधाभास आणि मानवी स्वभावाचे बारकावे अत्यंत सूचकपणे मांडणारी व्यंगचित्रकला आजही तितकीच प्रभावी आणि जिवंत आहे. ५ मे रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त उमरखेड येथील व्यंगचित्रकार प्रभाकर दिघेवार यांनी व्यक्त केलेले विचार या कलेच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारे ठरतात.
“व्यंगचित्र ही केवळ विनोदनिर्मिती नसून ती समाजप्रबोधनाची प्रभावी साधना आहे,” असे सांगताना दिघेवार म्हणाले की, एका छोट्याशा रेषेतून मोठा संदेश देण्याची ताकद व्यंगचित्रात असते. वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमधील व्यंगचित्रे वाचकांना केवळ हसवत नाहीत, तर विचार करायलाही भाग पाडतात.
व्यंगचित्र रेखाटन ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. समाजातील घटना समजून घेणे, त्यातील विसंगती ओळखणे आणि जनहित लक्षात घेऊन ती मांडणे हे अत्यंत संयमाचे आणि जबाबदारीचे काम आहे. व्यंगचित्रकाराने समाजाशी जोडलेले राहूनही तटस्थता राखणे आवश्यक असते. टीका करताना व्यक्तीचा अपमान न करता मुद्दा पोहोचवणे हीच खरी कलेची कसोटी आहे.
व्यंगचित्राची वैशिष्ट्ये सांगताना त्यांनी नमूद केले की, ही कला सहज, ओघवती आणि नेमकी असते. तिच्या रेषांमध्ये वेग, ताल आणि संतुलन असते. पाहता क्षणी मनावर ठसा उमटवण्याची ताकद हीच तिची खरी ओळख आहे.
इतिहासाच्या दृष्टीने पाहिले तर, १८९५ मध्ये जोसेफ पुलित्झर यांच्या न्युयार्क वर्ल्ड, मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘द, यलो किड’ या कॉमिक्सपासून आधुनिक व्यंगचित्रांची सुरुवात मानली जाते. या कॉमिक्सचे निर्माते रिचर्ड एफ आऊटकल्ट हे होते. त्यानंतर जगभरात व्यंगचित्रांनी माध्यमांमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवले.
मराठी व्यंगचित्र क्षेत्रात बाळासाहेब ठाकरे, वसंत सरवटे, मंगेश तेंदुलकर, सि. द. फडणीस, वसंत हळबे, प्रभाकर ठोकळ, विकास सबनिस यांसारख्या दिग्गजांनी आपली स्वतंत्र छाप सोडली. त्यांच्या परंपरेला पुढे नेण्याचे काम आजचे व्यंगचित्रकार करत आहेत.
आजच्या डिजिटल युगात ॲनिमेशन, सोशल मीडिया आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्ममुळे व्यंगचित्रांना नवीन व्यासपीठ मिळाले आहे. तरीही पारंपरिक व्यंगचित्रांचे महत्त्व कमी झालेले नाही. उलट, बदलत्या काळातही त्यांचा आशय अधिक धारदार आणि प्रभावी झाला आहे.
मात्र, मराठी व्यंगचित्रकारांची संख्या अजूनही मर्यादित आहे. या कलेला पुरेसा राजाश्रय, व्यासपीठ आणि प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. “तरुणांनी वाचन, निरीक्षण आणि सर्जनशीलतेच्या बळावर या क्षेत्रात पुढे यावे,” असे आवाहनही दिघेवार यांनी केले.