Will respond to MP Chavan's criticism at the right time: Betmogrekar
विशेष प्रतिनिधी
नांदेड : महाराष्ट्रातील काँग्रेस नेतृत्वहिन झाल्याचे तसेच हा पक्ष नात्यागोत्यात राहिल्याचे निदान भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी मंगळवारी येथे केले. त्यानंतर गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीतील घराणेशाहीचे उमेदवार तपासले असता या बाबतीत काँग्रेसपेक्षा भाजपा अव्वलस्थानी असल्याचे दिसून येते. त्यात खा. चव्हाण यांच्या कन्येचाही समावेश होता.
अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस पक्षत्यागास आता दीड वर्ष होत आले आहे. प्रारंभीच्या काळात त्यांनी आपल्या घराण्याला राजकीय पदे आणि प्रतिष्ठा देणाऱ्या काँग्रेस पक्षाबद्दल, या पक्षाच्या कार्यसंस्कृतीबद्दल टीकाटिप्पणी टाळली होती, पण गेल्या काही महिन्यांत त्यांनी काँग्रेस विरोधात वेळोवेळी वक्तव्ये केल्याचे दिसून आले.
भाजपाने अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठविल्यानंतर त्यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या रिक्त जागेवर पक्षातील कार्यकर्त्यास संधी न देता चव्हाण यांनी या मतदारसंघात आपल्या मुलीला उमेदवारी मिळवून दिली. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपासह राज्यातील प्रमुख ६ राजकीय पक्षांनी घराणेशाहीतील १९४ उमेदवार दिले होते. त्यात सर्वाधिक (४९) उमेदवार भाजपाचे होते. त्यानंतर काँग्रेसचा (४२ उमेदवार) क्रम होता.
नांदेड जिल्ह्यात भाजपाच्या ५ आमदारांपैकी भीमराव केराम वगळता इतर चौघेही घराणेशाहीतले आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपाने १४९ जागा लढविल्या, त्यांतील ४९ उमेदवार घराणेशाहीतील होते, असे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
खा. चव्हाण काँग्रेस पक्षात दीर्घकाळ सत्तेमध्ये होते. त्यांचे वडील शंकरराव चव्हाण यांची सत्ता परंपरा अशोक यांनी पुढे नेली. आता त्यांनी काँग्रेस पक्षावर नात्यागोत्यांचा पक्ष अशी टिप्पणी केली असली, तरी शंकररावांच्या काळाच्या आधीपासून काँग्रेसमध्ये घराणेशाहीची परंपरा होती.
मराठवाड्यात त्याचा सर्वाधिक लाभचव्हाण परिवाराला मिळाला, असे दिसते. शंकरराव १९५२ ते १९७७ पर्यंत सत्तेत वावरले. मग १९८० ते १९८९ आणि १९९१ ते ९६ हा त्यांचा सत्ताकाळ होता. (एकूण वर्षे ३९) अशोक चव्हाण यांना मंत्री-मुख्यमंत्री या नात्याने साडेपंधरा वर्षे सत्ता मिळाली. मधल्या काळात खा. चव्हाणांच्या पत्नीलाही ५ वर्षे आमदारकी मिळाली.
खा. चव्हाण यांनी काँग्रेस पक्षावर केलेल्या टीकेला स्थानिक पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांनी अद्याप उत्तर दिलेले नाही. पण शारदा भवन शिक्षण संस्थेसह भाऊराव कारखान्यातही चव्हाण यांनी घराणेशाहीचा झेंडा फडकविला आहे, याकडे त्यांच्या एका कट्टर विरोधकाने लक्ष वेधले आहे.
खा. अशोक चव्हाण काँग्रेस पक्षाबद्दल जे काही बोलले, ते आम्ही समाजमाध्यमांतील ध्वनीचित्रफितीत ऐकले. त्यांच्या वक्तव्यास आम्ही योग्यवेळी उत्तर देऊ.हनमंतराव बेटमोगरेकर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस