Degloor worker dies in water pit
देगलूर : देगलूर शहरातील नवीन बसस्थानक परिसरात चार्जिंग स्टेशनसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून पश्चिम बंगालमधील एका युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि. ९) रात्री उशिरा घडली. या अपघातास कंत्राटदाराचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल राज्यातील उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील हेमंताबाद तालुक्यातील कनतुर येथील अनिसुर रहेमान युसुफ अली (वय ३४) हा युवक हॉटेलमधील कामासाठी देगलूर येथे आला होता. रात्री उशिरा बसस्थानकात आल्यानंतर लघुशंकेसाठी सुलभ शौचालयाच्या बाजूला जाताना ही दुर्घटना घडली.
चार्जिंग स्टेशनच्या बांधकामावेळी खोदलेला खड्डा कंत्राटदाराने न भरल्याने त्यात पावसाचे आणि घाण पाणी साचले होते. परिसरात अंधार असल्याने अनिसुर याला खड्ड्याचा अंदाज आला नाही आणि तो त्यात पडला. पाण्यात पडताच त्याने आरडाओरड केली, मात्र कुणाचेही लक्ष गेले नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी माधव मरगेवार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलिस वर्दी उतरवून स्वतः खड्यात उतरून बचावकार्य सुरू केले, मात्र पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने अनिसुरच्या पोटात पाणी गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.
या घटनेबाबत मोहम्मद नवाज शरीफ (वय २७, रा. कनतुर, ता. हेमंताबाद, जि. उत्तर दिनाजपूर) यांनी फिर्याद दाखल केली असून, कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक म्हैसनवाड हे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
चार्जिंग स्टेशनसाठी केलेल्या खोदकामानंतर खड्डे न भरल्यामुळे पावसाचे पाणी साचून प्रवाशांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. अनिसुर यांच्या मृत्यूनंतर प्रवाशांकडून या कंत्राटदाराविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे.