महेश राजे
नांदेड ः पश्चिम बंगालची निवडणूक देशभरातच नव्हे तर जगात चर्चेचा ठरली आहे. एसआयआरमुळे बोगस मते विक्रमी घटली असून मतदानाची टक्केवारी प्रचंड वाढली आहे. आता दि. 29 रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यावेळी ममता दीदीचे पायउतार होणे निश्चित मानले जाते. त्यासाठी नांदेड जिल्ह्यातून सुमारे 15 हजार कारागीर, मजूर मागच्या आठवड्यात पश्चिम बंगालला रवाना झाले आहेत.
मागील वर्षभरात झालेली प्रत्येकच निवडणूक एस.आय.आर. मुळे कमालीची लक्षणीय ठरली. लाखो बोगस मते घटल्याने निवडणुकांत रंगत सुद्धा निर्माण झाली. बिहार, झारखंड या राज्याच्या निवडणुकांनंतर आता आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पाँडेचेरी या पाच राज्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. आसाम, पाँडेचेरी आणि केरळ या राज्यांत 9 एप्रिल रोजी मतदान पार पडले. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 23 एप्रिलला झाले. आता 29 एप्रिल रोजी प.बंगालमध्ये दुसऱ्या व शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यानंतर 4 मे रोजी प्रत्यक्ष मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील.
नांदेडसह आजूबाजूच्या जिल्ह्यात पश्चिम बंगालमधील लाखांवर कारागीर व मजूर कामासाठी ठराविक कालावधीसाठी वास्तव्यास असतात. प्रामुख्याने आर.सी.सी.बांधकाम, राज्य व राष्ट्रीय महामार्ग, सरकारी इमारतींचे बांधकाम, टेन्ट हाऊसचे सुशोभीकरण, सराफा बाजारात कारागीर, मोठ्या हॉटेलमध्ये वेटर तसेच मुस्लिम कामगार कपड्यांच्या मोठ्या शो रुम्स व दुकानांत कार्यरत आहेत. एकट्या नांदेड शहरात पाच ते सात हजार लोक कार्यरत असून जिल्ह्यात हा आकडा 15 हजारांच्या आसपास जातो. मागील आठवड्यात दि. 20 एप्रिल रोजी पूर्णा ते संत्रागच्छी या संत्रागच्छी या अतिजलद रेल्वेने हे सर्व बंगाली लोक रवाना झाले आहेत.
प्रामुख्याने हुगली, सिलीगुडी, नदिया, बर्धमान, बिलासपूर या जिल्ह्यातील हे कारागीर व मजूर आहेत. यावेळी विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम (एसआयआर) यामुळे निवडणूक प्रचंड उत्कंठावर्धक ठरली असून यापूर्वीसुद्धा निवडणुकीच्या वेळी उत्साही लोक जात होते. परंतु यावेळी झाडून सारे बंगाली कारागीर, मजूर रवाना झाले आहेत. आता ही मंडळी 4 मे रोजी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर जल्लोष साजरा करून 6 मे रोजी बुधवारी हे सर्व मजूर परत संत्रागच्छी ते हुजूर साहिब नांदेड या अतिजलद रेल्वेने परततील. ज्या मध्यस्थामार्फत हे मजूर महाराष्ट्राच्या विविध भागांत कामासाठी येतात, त्यांच्याशी चर्चा केली असता यावेळी पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन अटळ असून ममता दीदीला जबर झटका बसेल, असे संकेत आहेत.
दरम्यान, नांदेडसह परिसरातील बंगाली कारागीर व मजूर मतदानासाठी पश्चिम बंगालला रवाना झाल्यामुळे मागील दहा दिवसांपासून बांधकामे ठप्प असून संबंधित जागा मालकांची प्रचंड अडचण झाली आहे. एरवी मोजके लोक मतदानासाठी जात होते. परंतु यावेळी झाडून सारे मतदार गेल्याने सर्वच बांधकामे पंधरा ते वीस दिवस लांबली आहेत. इकडे वातावरण बदलत असून एकदा अवकाळी पाऊस पडून गेला. आता पुन्हा अवकाळी किंवा वळिवाच्या पावसाला सुरुवात झाली तर मात्र बांधकाम मालकांची मात्र कमालीची गोची होणार आहे.
मे महिन्यात कामे पूर्ववत- एसआयआरमुळे झाडून सारे बंगाली बांधव मतदानासाठी पश्चिम बंगालला गेले आहेत. या राज्याच्या विविध जिल्ह्यांतून लोक आलेले असल्याने दोन्ही टप्प्यातील मतदान व नंतर मतमोजणी आटोपूनच ते परतणार आहेत. नांदेडहून प.बंगालला जाण्यासाठी आठवड्यातून एकदाच रेल्वे असल्याने मागील सोमवारी (दि. 20) मोठ्या संख्येने बंगाली मजूर व कारागीर रवाना झाले. तर आता मतमोजणी नंतरच्या बुधवारी (दि. 6 मे) रोजी परतीची रेल्वे असून दि. 7 रोजी ही मंडळी परततील. त्यानंतर कामे पूर्ववत सुरू होतील. यावेळी बंगालमध्ये परिवर्तन अटळ असल्याचे दिसून येते.बिनय मिस्त्री, गुत्तेदार, प.बंगाल