Water discharge from Vishnupuri continues
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नोव्हेंबर संपत आला तरी विष्णुपुरी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. अधुनमधून दरवाजे उघडून आवश्यक तेवढे पाणी सोडण्यात येते आहे. रविवारी सकाळी सुमारे साडे सात वाजता चार क्रमांकाचा दरवाजा उघडून १८ हजार ६१० क्युसेक पाणी पात्रात सोडण्यात आले. वरील भागातून पाण्याची आवक सुरु असल्याने हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे सांगण्यात आले.
नांदेड जिल्ह्यात दि. १ नोव्हेंबरपासून पाऊस थांबला असला तरी हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार राज्याच्या काही भागात अधुनमधून पाऊस पडतो आहे. विशेषतः गोदावरी नदीच्या खोऱ्यात पाऊस पडू लागल्याने वरील जलाशयांतून पाणी सोडले जात आहे. यंदा ऑगस्टपासून पावसाचे प्रमाण अधिक असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील धरणे भरली असून सुरक्षेच्या कारणास्तव सर्वच ठिकाणाहून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
भविष्याचा अंदाज घेऊन विष्णुपुरीत पावसाळा अखेरपर्यंत पाऊस सुरुच राहिला तर ११० टक्के पाणी राखीव ठेवले जाते. वरचे १० टक्के पाणी सुद्धा खूप फायदेशीर ठरते, असे प्रकल्प व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. एकंदर परिस्थिती पाहता डिसेंबर अखेरपर्यंत विष्णुपुरी प्रकल्पात १०० टक्के साठा असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याची अजिबात टंचाई भासण्याची शक्यता नाही.
मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडी मधून अजूनही सुमारे ३ दशलक्ष घनमीटर पाणी सोडले जात आहे. या धरणातून या पावसाळ्यात आजवर ४ हजार ८६९ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले. जायकवाडीतून सोडलेले पाणी पुढील जलाशयांत येत असून त्यात साठवण क्षमता अजिबात उरली नसल्यामुळे ते तसेच पुढे वाहून येते आहे. परिणामी विष्णुपुरी प्रकल्पातूनही पाण्याचा विसर्ग करावा लागत असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.