Water crisis : नांदेडमध्ये पाणीबाणी; विष्णुपुरी प्रकल्पात ३८ टक्केच पाणीसाठा file photo
नांदेड

Water crisis : नांदेडमध्ये पाणीबाणी; विष्णुपुरी प्रकल्पात ३८ टक्केच पाणीसाठा

१०४ लघु-मध्यम प्रकल्पांतील पाणी गेले तळाला

पुढारी वृत्तसेवा

Water crisis in Nanded; only 38% water storage in Vishnupuri project

नांदेड, पुढारी वृत्तसेवाः जून महिना संपण्यासाठी केवळ आठवडा शिल्लक असतानाही पावसाने अद्याप हजेरी लावली नसल्यामुळे नांदेड जिल्ह्यात पाणी टंचाईचे भीषण संकट निर्माण होत आहे. प्रचंड उष्णता आणि बाष्पीभवनामुळे शहराची तहान भागविणाऱ्या विष्णुपुरी जलाशयातील पाणी पातळी झपाट्याने घटत आहे. केवळ ३८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनत आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात शहर व जिल्ह्यातील काही भागात मान्सूनपूर्व सरी बरसल्या. प्रचंड उकाड्यानंतर या पावसामुळे नागरिकंना काहीसा दिलासा मिळाला होता. 8 जून रोजी मृग नक्षत्र सुरु झाल्यानंतर मान्सून लवकरच दाखल होईल, असा अंदाज व्यक्त होत असतानाच जून महिन्याचे २० दिवस उलटले, तरी पावसाचा पत्ता नाही. परिणामी जिल्ह्यातील मोठे, लघू आणि मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी खोलवर गेली आहे.

जिल्ह्यातील अनेक गावांत आजही टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु असून दमदार पाऊस झाल्याशिवाय टँकरने होणारा पाणीपुरवठा सुरुच राहणार आहे. त्यासाठी जलाशयात पर्याप्त पाणीसाठा असणे आवश्यक आहे. परंतु विष्णुपुरीसह जिल्ह्यातील 104 लघू आणि मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा अत्यंत कमी कालावधीसाठी शिल्लक आहे. दुसरीकडे मान्सून लांबल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करण्याचे आवाहन कृषी विभागाने केल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

काही तालुक्यात शेतकऱ्यांनी हळद, कपाशीची लागवड केली असली तरी पाऊस न झाल्यामुळे या पिकांना विहिरीतील शिल्लक पाणी देण्याची वेळ आली आहे. भरउन्हात शेतकरी कुटुंबियांसह या पिकांना जीवदान देण्याचा अटोकाट प्रयत्न करीत आहेत.

उन्हाच्या तीव्रतेत वाढ; पाणीपुरवठ्यावर परिणाम

जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. मागील आठवड्यापासून शहराचे तापमान ४० अंशावर गेले असून पावसाळा कधी सुरु होणार, याची प्रतीक्षा सुरु आहे. नांदेड शहरातील अनेक भागात चार-पाच दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. आणखी आठवडाभर पावसाचे आगमन न झाल्यास आणि उन्हाची तीव्रता अशीच राहिल्यास याचा परिणाम शहरातील पाणी पुरवठ्यावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT