Wardha Yavatmal Nanded Railway Project Pudhari
नांदेड

Wardha Nanded Rail Line | वर्धा–यवतमाळ–नांदेड रेल्वेमार्गाच्या कामाला वेग: वर्धा–देवळी–कळंब पहिला टप्पा पूर्ण

कळंबनंतर यवतमाळ–पुसद–उमरखेड पट्ट्यात बांधकामाची धूम; पूल, बोगदे आणि भूसंपादनाची कामे प्रगतिपथावर

पुढारी वृत्तसेवा

Wardha Yavatmal Nanded Railway Project

प्रशांत भागवत

उमरखेड : विदर्भ आणि मराठवाड्याला थेट रेल्वेने जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी वर्धा–यवतमाळ–नांदेड नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. तब्बल २८४ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पातील वर्धा–देवळी–कळंब हा पहिला टप्पा पूर्ण होऊन रेल्वे वाहतुकीसाठी खुला झाला आहे. आता कळंब ते यवतमाळ आणि पुढे दारव्हा, दिग्रस, पुसद, उमरखेड परिसरातून नांदेडकडे जाणाऱ्या मार्गावर भूसंपादन, माती भराव, पूल, बोगदे आणि रेल्वे स्थानकांच्या उभारणीची कामे सुरू आहेत.

रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, मार्च २०२६ पर्यंत या प्रकल्पावर ४ हजार ८०२ कोटी रुपये खर्च झाले असून, २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ८२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या रेल्वेमार्गाच्या कामाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

यवतमाळ–दिग्रसदरम्यान पुलांची कामे

कळंब ते यवतमाळ या सुमारे ४० किलोमीटरच्या टप्प्यात माती भराव, भूसंपादन आणि स्थानकांच्या उभारणीची कामे सुरू आहेत. यवतमाळ–दिग्रस पट्ट्यात प्रमुख पुलांची बांधकामे प्रगतिपथावर असून, रेल्वेमार्गासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची कामेही हाती घेण्यात आली आहेत.

दिग्रस–पुसद–उमरखेड परिसरातील डोंगराळ भूप्रदेश, नदी-नाले आणि जंगलांमुळे बांधकामात आव्हाने आहेत. या भागात मोठे पूल आणि बोगदे उभारले जात असून, बोगद्यांच्या खोदकामातही प्रगती होत आहे. दिग्रस–नांदेड या सुमारे १२७ किलोमीटरच्या टप्प्यात ५५ प्रमुख पूल प्रस्तावित आहेत.

भूसंपादनाचे काम निर्णायक टप्प्यात

संपूर्ण प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या १ हजार ९७४ हेक्टर जमिनीपैकी १ हजार ३३८ हेक्टर जमीन संपादित झाली आहे. तसेच प्रस्तावित १३६ प्रमुख पुलांपैकी ९३ पुलांची कामे पूर्ण झाली आहेत. रेल्वे उड्डाणपुलांच्या कामांनाही गती मिळत आहे.

विदर्भ–मराठवाड्याच्या विकासाला चालना

या रेल्वेमार्गामुळे यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, पुसद आणि उमरखेड परिसरातील नागरिकांना रेल्वे प्रवासाची सुविधा मिळणार आहे. कापूस, सोयाबीन आणि अन्य कृषी उत्पादनांची वाहतूक सुलभ होऊन शेतकऱ्यांना मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचणे शक्य होईल. औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि स्थानिक व्यापारालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

नांदेड येथील श्री हजूर साहिबसह धार्मिक व पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचणेही अधिक सोयीचे होणार आहे. त्यामुळे २८४ किलोमीटरचा हा रेल्वेमार्ग विदर्भ आणि मराठवाड्याच्या दळणवळणासह आर्थिक विकासासाठी महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT