Nanded Crime News
उमरी : उमरी रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या एका शेतातील झाडाला पंचवीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.
भोकर तालुक्यातील सोनारी येथील शिवचरण चंपतराव पाटील (वय २५) असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण गेल्या काही दिवसांपासून हैदराबाद येथे नोकरीसाठी गेला होता. मंगळवारी तो रेल्वेने उमरीत आला. सायंकाळी त्याने जेवण वगैरे केले आणि रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या एका शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले.
ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी पंचनामा केला. दुपारी उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. या प्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामागचे कारण मात्र समजू शकले नाही.
उमरखेड बसस्थानक परिसरात चाकू-लोखंडी रॉडने हल्ला
फोनवरून एका विशिष्ट जातीला उद्देशून शिवीगाळ केल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर चाकू आणि लोखंडी रॉडने मारहाण झाली. उमरखेड बसस्थानकाजवळ २१ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १० वाजता ही घटना घडली. या प्रकरणी दोन्ही पक्षांच्या तक्रारीवरून उमरखेड पोलिसांनी परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख इस्त्राईल शेख महमूद (वय ५३, रा. रहीम नगर, उमरखेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, फोनवरून एका विशिष्ट जातीसंदर्भातील संबोधनात्मक शिवी वारंवार का देतोस, असे विनोद बबन पोंगाणे (वय ५२, रा. शिवाजी वॉर्ड, उमरखेड) यांना विचारण्यात आले. त्यावेळी पोंगाणे यांनी ‘तुम्ही मला हटकणारे कोण, आता तुम्हाला दाखवतोच’, असे म्हटल्याचे तक्रारीत नमूद आहे.