नरेंद्र येरावार
उमरी : उमरी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गाव तलावात एका तरुणाचा मृतदेह तरंगत असताना दिसला. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह बाहेर काढून शोध घेतला असता त्याची ओळख पटली आहे. सदरील घटना ही गुरुवारी सायंकाळी घडली असून याप्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रकाश बाबूसिंग चौहाण (वय 45 वर्ष खाजगी नोकरी रा. मास्तर कॉलनी, उमरी हल्ली मुक्काम हैदराबाद) यांचा मृतदेह उमरी शहराच्या गाव तलावात आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने, उपनिरीक्षक सुदर्शन धांदू, माणिक कदम, जमादार सुनील कोलबुद्धे, अरविंद हैबतकर यांनी घटनास्थळावर जाऊन कोळी लोकांकडून सदरील मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. या नंतर नातेवाईकांना कळविण्यात आले.
या संदर्भात विठ्ठलसिंग राजपूत यांनी उमरी पोलीस ठाण्यात अर्ज दिला आहे. यावरून उमरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सायंकाळी उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर गुरुवारी रात्री त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी दिली आहे...