Umri Government Offices, 
नांदेड

Nanded News | रेल्वेच्या वेळापत्रकानुसार चालतो उमरीतील शासकीय कार्यालयांचा कारभार; दुष्काळात नागरिकांची गैरसोय

देवगिरी एक्सप्रेस दुपारी दोन वाजता; अधिकारी-कर्मचारी कार्यालयात अडीच वाजता दाखल

पुढारी वृत्तसेवा

Umri Government Offices

नरेंद्र येरावार

उमरी : शासनाने दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहावे, असे निर्देश दिले आहेत. मात्र, उमरी शहरातील अनेक शासकीय व निमशासकीय कार्यालयांचा कारभार रेल्वेच्या वेळापत्रकानुसार सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. गुरुवारी देवगिरी एक्सप्रेस उमरी रेल्वे स्थानकावर दुपारी दोनच्या सुमारास दाखल झाल्यानंतर अनेक अधिकारी-कर्मचारी अडीच वाजता कार्यालयात पोहोचले. त्यामुळे कार्यालयीन कामकाजाला प्रत्यक्ष सुरुवात होण्यास विलंब झाला. या प्रकारामुळे विविध कामांसाठी तालुक्यातून आलेल्या नागरिकांना ताटकळत बसावे लागले.

उमरी शहरातील अनेक शासकीय कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचारी दररोज देवगिरी एक्सप्रेसने ये-जा करतात. गुरुवारी सकाळी दहा वाजता उमरीत पोहोचणारी ही रेल्वे तब्बल चार तास उशिराने, दुपारी १ वाजून ५५ मिनिटांनी स्थानकात दाखल झाली. रेल्वे स्थानकापासून कार्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी कर्मचाऱ्यांना आणखी १५ ते २० मिनिटे लागली. परिणामी, अनेक कार्यालयांतील कामकाज दुपारी अडीचच्या सुमारास सुरू झाले.

दरम्यान, विविध शासकीय कामांसाठी सकाळपासून कार्यालयांत आलेल्या नागरिकांना या विलंबाचा नाहक त्रास सहन करावा लागला. सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा वेळी शासकीय कार्यालयांत अधिकारी-कर्मचारी वेळेवर उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय अधिकच वाढत आहे. शासनाने दुष्काळी परिस्थितीत अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे बंधन घातले असून, रजांबाबतही निर्बंध लागू केले आहेत. असे असतानाही कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

बायोमेट्रिक यंत्रणा बंद असल्याची तक्रार

शासकीय कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने बायोमेट्रिक उपस्थिती यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, उमरीतील अनेक कार्यालयांमध्ये ही यंत्रणा बंद असल्याची तक्रार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर प्रभावी नियंत्रण राहत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. संबंधित कार्यालयांतील बायोमेट्रिक यंत्रणा सुरू करून उपस्थितीची नोंद सक्तीने घेण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी

शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी-कर्मचारी रेल्वेच्या वेळेनुसार कार्यालयात येत असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांसह शेतकऱ्यांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.

या प्रकरणी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. कार्यालयांतील उपस्थितीची तपासणी करून वेळेवर कामकाज सुरू होईल, याची खात्री करावी. तसेच, दुष्काळाच्या काळात शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घ्यावा, अशी मागणी उमरीतील नागरिकांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT