Two accused in Mahur murder case arrested
विशेष प्रतिनिधी
नांदेड : माहूर तालुक्यातील मौजे पाचुंदा या गावामधील शेतामध्ये कापूस वेचणीचे काम करणाऱ्या दोन सख्ख्या जावांची गुरुवारी दुपारी गळा दाबून निघृण हत्या करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अवघ्या २४ तासांत ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अंतकलाबाई अशोक अडागळे (वय ६०) आणि अनसूयाबाई साहेबराव अडागळे (वय ४५) या दोन सख्ख्या जावा गुरुवारी पाचुंदा येथील शेतामध्ये कापूस वेचणीचे काम करत असताना चोरीच्या उद्देशाने तेथे आलेल्या आरोपींनी या दोघींची गळा दाबून हत्या केली. नंतर त्यांच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने काढून ते पसार झाले.
ही घटना सायंकाळी उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर काही धागेदोरे मिळाले. लुटमारीतून हा प्रकार घडला असावा, असा संशय पोलिसांना आला. या महिलांच्या अंगावरील दागिने गायब असल्याची माहिती मृत महिलांच्या नातेवाईकांकडून मिळाल्यांनतर पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार, भोकरचे अपर पोलिस अधीक्षक किरण भोंडवे यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय यांच्या यंत्रणेने तपास सुरू केला.
पोलिसांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक रवी वाहूळे व त्यांच्या पथकाने किनवट माहूर दरम्यान शोधकार्य सुरू केले. संशयितांच्या रेखाचित्राच्या आधारे तपास सुरू असताना एक आरोपी माहूर तालुक्यातील सेलूकरंजी येथे त्याच्या नातेवाईकाच्या शेतावर लपून बसला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे जाऊन दत्ता सुरेश लिंगलवार (रा. सावळी जि. यवतमाळ) यास तेथून ताब्यात घेतले.
या आरोपीने दिलेल्या माहितीवरून त्याचा मित्र असलेल्या गजानन गंगाराम येरजरवार याला माहूर तालुक्यातील करंजी येथून ताब्यात घेतले गेले. पोलिसांनी या दोघांकडे आपल्या खास पद्धतीने चौकशी केली असता दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली मोटारसायकल तसेच दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले.
या दोन्ही आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी माहूर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. या दोन आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१), ३११, ३०९ (६) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील मुख्य आर- ोपीवर यवतमाळ जिल्ह्यातही काही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस निरीक्षक खंडेराय यांनी दिली.